आला पावसाळा.. तब्येत सांभाळा..

सामना ऑनलाईन । मुंबई

वाट पाहायला लावून अखेर वरुणराजा महाराष्ट्रावर प्रसन्न झाला आहे. मात्र पावसाचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. वातावरणातील दमटपणा आणि गारवा यांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं. पावसाळ्यात डासांची पैदास जास्त होते. जर दवाखान्याची वारी टाळायची असेल तर पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी स्वच्छता आणि त्यासोबत विविध बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.

पावसाळ्यातील आजार

 • हिवताप, मलेरिया- पावसाळ्यात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. अॅनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते.
 • सर्दी, खोकला- अंगावर ओले कपडे जास्त वेळ, पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात.
 • दमा- ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो.
 • जुलाब- पावसाळ्यात पाण्याची प्रदूषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते.
 • पायाला चिखल्या होणे- पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.

उपाययोजना आणि प्रतिबंध

 • पावसात भिजणे टाळावे.
 • पावसात भिजल्यास तात्काळ कपडे बदलावेत.
 • डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करावा. घरात किंवा परिसरात स्वच्छता ठेवावी. तसेच डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करावा.
 • स्वच्छ पाणी प्यावं. गरज असल्यास गरम पाणी प्यावं.
 • आजाराची लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आहार विषयक काळजी

 • पावसाळ्यात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फूड, उपवासासाठी शेंगदाणे किंवा भगर हे पदार्थ खाणे टाळावे.
 • पचायला हलके आणि उष्ण पदार्थ शक्यतो घ्यावे. यामध्ये बेसन लाडू, टोमॅटो सूप, वांगी, भेंडवळ, कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे या पदार्थांचा वापर करावा.
आपली प्रतिक्रिया द्या