समाजमाध्यमांचा Smart वापर

2270

>> नितीन फणसे, [email protected]

आपले आजी-आजोबाही समाजमाध्यमांचा वापर खूप आवडीने करतात. पण उत्साहाच्या भरात एखाद्या लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही समाजमाध्यमे चतुरपणे कशी हाताळावीत यासाठी थोडय़ा सूचना…

पासवर्ड ठेवतानाची काळजी
– समाजमाध्यमांवर प्रत्येकाचा पासवर्ड असतो. लक्षात राहायला हवा म्हणून आजी-आजोबा सोपा पासवर्ड ठेवतात. आपल्या पतीचे वा मुलाचे नाव, वाढदिवस किंवा लग्नाचा दिवस पासवर्ड म्हणून ठेवतात. पण तसं करता कामा नये. पासवर्ड मोठा असला तरी चालेल पण तो कठीण ठेवा. वाटलं तर एका डायरीत तो लिहून ठेवा. पण स्ट्राँग पासवर्डमुळे तो कुणीही हॅक करू शकणार नाही.
– काही आजी-आजोबा फेसबुक, जीमेल किंवा ट्विटरसाठी एकच पासवर्ड ठेवतात. पण तो जर कुणाला कळला तर त्यांच्या सगळ्याच समाजमाध्यमांमध्ये कुणीही शिरू शकेल. त्यासाठी प्रत्येक समाज माध्यमासाठी वेगळा पासवर्ड ठेवा.
– बऱयाच समाजमाध्यमांवर पासवर्ड बनवताना खुणेचा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर काळजीपूर्वक ठरवा. कारण कुणी तुमचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न करेल तर समाज माध्यमांवर तो खुणेचा प्रश्न विचारला जातो. तो त्याला माहीत नसेल तर फेसबुक हॅक होऊ शकत नाही.
– आताचे आजी-आजोबा संगणकावर नव्हे तर आपल्याकडील मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर ही समाज माध्यमं वापरतात. त्यामुळे मोबाईलमध्येही पासवर्ड प्रोटेक्शन ऍप जरूर घ्या.

फेसबुक खात्याबाबत…
– फेसबुकवर अनेकजण एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. काहीवेळा तर फेसबुकच आपल्याला ‘यांना तुम्ही ओळखत असाल’ असे सांगत नवनवे फ्रेंड सजेशन पाठवतात. अशावेळी कुणाला मित्र करून घ्यायचे त्यावर आजी-आजोबांनी लक्ष द्यायला हवे. आपण खरोखरच ओळखत असू तरच एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा. बरेचदा खोटे अकाऊंट बनवूनही लोक बनवाबनवी करत असतात.
– फेसबुक हे सोशल माध्यम बहुतांश हॅक व्हायला सोपे असते. एक साधीसुधी लिंक आपल्या फेसबुक अकाऊंटवर येते. त्यावर आपण सहज क्लिक करतो… पण येथेच आजी-आजोबांनी लक्ष देणे गरजेचे असते. अशी कुठलीही लिंक क्लिक करू नका. आपल्या फ्रेंड्सपैकी कुणी पाठवलेली नसेल तर कुठल्याच लिंककडे बघूही नका.
– फेसबुकवर अनेकदा आपल्याला काही मेसेज, काही व्हिडीओज आवडतात. आपल्या परिजनांना शेअर करायची आपली इच्छा होते. अशावेळी आजी-आजोबांनी सावध राहायला हवे. दुसऱयाला काहीही शेअर करताना आपण काय शेअर करतोय, त्यात कुणाच्या घरचा पत्ता, आर्थिक बाबी किंवा कुणाचा फोन नंबर तर नाही ना… याची दक्षता घ्या.
– फेसबुकवर प्रायव्हसी सेटिंग म्हणून ऑप्शन असतो. त्यात आपल्या पोस्ट कुणी पाहाव्यात, कुणी नाही त्याचं ते ठरवता येतं. आजी-आजोबांनी ते सेटिंग नीट करून ठेवले पाहिजे.
– संगणकावर फेसबुक वापरत असाल तर एखादा चांगला ऍण्टीवायरस ऍप नक्की घ्या. त्यामुळे बनावट आणि अनावश्यक नेट साईट्सना आळा बसू शकतो.
– आजच्या दिवशी घरात कुणाचा वाढदिवस, कोणता सोहळा असेल तर त्याबाबत फेसबुकवर काहीही पोस्ट करायची नाही हे आजी-आजोबांनी लक्षात ठेवायला हवे. कारण त्याचाच वापर तुमची माहिती मिळवायला पुरेशी ठरते.
– फेसबुकवर आपल्या खासगी बाबी कुणी टाकू नयेत असं वाटत असेल तर आपणही दुसऱयाच्या खासगी बाबी पोस्ट करायच्या नाहीत. शेवटी महत्त्वाचे म्हणजे फेसबुक लॉग ऑफ करायला विसरू नका.

टीप्स

– तुम्ही कोठे आहात हे समाजमाध्यमांवर उत्साहाच्या भरात टाकण्याची आवश्यकता नाही. व्यक्तिगत आयुष्य जपावे.
– अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करणे टाळलेलेच बरे.
– अनेक ज्येष्ठांना मोबाईल किंवा टॅबवर खेळ खेळायला आवडते. त्यात गैर काहीच नाही. पण काही मोजके आणि अधिकृत, माहीत असलेले गेम्सच मोबाईलवर ठेवा.

शॉपिंग ऍप्सच्या प्रलोभनांना बळी पडू नका.
– माहितीच्या शॉपिंग ऍप्सवरून खरेदी अवश्य करा, पण कॅश ऑन डिलिव्हरीचाच वापर करा. म्हणजे आर्थिक गैरव्यवहारांना आपसूकच आळा बसेल.
– क्रेडिट कार्डपेक्षा डेबिट कार्डचा वापर अवश्य करा.
– समाजमाध्यमे ही एकमेकांशी जोडली जाण्याची, मनोरंजनाची, माहितीची, प्रबोधनाची उत्तम साधने आहेत. त्यांचा योग्य आणि सुज्ञ वापर करून अर्थात काळासोबत राहा.

आपली प्रतिक्रिया द्या