परीक्षेसाठी… काही महत्वाचे

162

परीक्षेसाठी अभ्यास करणे जसे महत्त्वाचे… तशाच अजूनही काही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी…

  • विद्यार्थ्यांनी सकाळी नियमित नाश्ता करावा. सकाळच्या नाश्त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स, ओट्स, अंडी, पोहे, उपमा इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. याबरोबरच एक ग्लास दूध प्यावे. नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेत एखादे फळ किंवा सलाड खावे. यामुळे पोट भरलेले राहील आणि अभ्यासातही मन लागेल.
  •  दुपारच्या जेवणात वरण-भात, भाजी-पोळी आणि दही यांच्या समावेश असू द्या. जेवल्यानंतर लगेचच अभ्यास करायला बसू नका. खाल्लेल्या अन्नाचं पचन व्हावं याकरिता १५-२० मिनिटे वॉक करा. यामुळे पचनाच्या समस्यांपासून दूर राहू शकाल.
  • रात्रीच्या जेवणात चटकदार, मसालेदार, तळलेल्या पदार्थांचा समावेश कमी असावा. रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्या. दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणादरम्यान हेल्दी स्नॅक्सचा खाण्यात समावेश करावा. रात्रीच्या जेवणानंतरही लगेच झोपू नका. थोडा वेळ वॉक घेऊनच झोपावे.
  • परीक्षेदरम्यान येणारा थकवा दूर करण्याकरिता गरम दूध प्यावे किंवा कमी चहा पूड घालून केलेला चहा लाभदायक आहे.
  • रात्रीच्या वेळी जागरण करून अभ्यास करू नका. ८ तासांची झोप शरीरस्वास्थ्याकरिता आवश्यक आहे. यामुळे थकवा आणि आळस येत नाही.

असा घालवा तणाव

  • मुलांच्या मनावर परीक्षेचं मोठं टेन्शन असतं. अशावेळी भूक न लागणे, अभ्यासात मन न लागणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. याकरिता विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊनही विद्यार्थ्यांनी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
  • परीक्षेचा तणाव घालवायला पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. यात दुधाचा समावेश असेल तर तणाव बराच कमी होईल.
  • पौष्टिक आहाराबरोबरच जरुरी पोषकद्रव्ये असलेले पदार्थही असतील तर परीक्षेच्या काळात मुलांचे लक्ष केंद्रित व्हायला मदत होईल.
  • परीक्षेच्या काळात मुलांनी अभ्यासाचा तणाव दूर करण्यासाठी आयर्न, व्हिटॅमीन्स आणि खनिजे असलेले पदार्थ खायला पाहिजेत. मुलांच्या डाएटमध्ये कोणत्याही पोषकद्रव्याची कमतरता राहता कामा नये. यासाठी दुधात हॉर्लिक्स घालून आणि त्यात बदाम घालायला विसरायचे नाही.
  • परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये. त्यामुळे चिडचिड होऊन पेपरवर विपरीत परिणाम होऊ शकतो. वेळेचे नियोजन करून शांततेने पेपर सोडवावा. अपयशाची भीती बाळगू नये.

पूर्ण झोप हवीच

परीक्षेच्या काळात रात्री पूर्ण झोप मिळणं खूप आवश्यक आहे. ती मिळाली तर परीक्षेचा दिवस चांगला जाऊ शकतो. ताणतणाव वाढला की एक दीर्घ श्वास घ्यायचा. त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि विचारांवर लक्ष केंद्रित व्हायला मदत होते. पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, अभ्यासातून ठरावीक वेळ ब्रेक आणि योग्य मानसिक दृष्टीकोन याचा परिणाम परीक्षेच्या काळात नक्की होतो. अभ्यास झालेला असतानाही काही विद्यार्थी आत्मविश्वास गमावतात. असे होऊ नये याकरिता मनःशांती म्हणून मेडिटेशन, योगासने करावीत. विद्यार्थ्यांनी इतरांशी आपली तुलना करू नये, स्वतःमधील गुण, क्षमता आणि मर्यादा ओळखून स्वतःमध्ये बदल करायला हवा. दिवसभराच्या नियोजनाचे वेळापत्रक करावे.

आपली प्रतिक्रिया द्या