थंडीतही चमकदार केस

81

सध्या हवेत गारवा जाणवू लागला असून आल्हाददायक थंडीला सुरुवात झाली आहे. या गार वातावरणाचा परिणाम त्वचा, केस अशा शरीरातल्या प्रत्येक अवयवावर होत असतो. कित्येकदा या दिवसांत टाळूला खाज येते किंवा कोंडयाच्या प्रमाणात वाढ होते. म्हणूनच या दिवसांत केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळी शुष्कतेपासून बचाव होण्यासाठी त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. पण खूपदा केसांकडे दुर्लक्षच होतं.

थंड हवामान केस आणि टाळूमधील आर्द्रता शोषून घेतं. त्यामुळे त्वचेवर खपल्या येतात, कोंडा जमा होतो आणि कमजोर केसांचे फॉलिकल्स तयार होतात. त्यामुळे केसांतील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस शुष्क आणि निस्तेज बनतात. पुष्कळ वेळा अत्याधिक मेद स्रव केस चिकट बनवतो. परिणामी केसांमध्ये धूळ आणि केरकचरा चिकटतो आणि केस निस्तेज आणि कडक बनतात. केसात फार गुंता होत असतो. केसांची चमक फिकी पडते.

थंड हवामानामुळे टाळूच्या त्वचेची छिद्रं आकुंचन पावतात. त्यामुळे बुरशी येते. कित्येकदा सुक्ष्म जंतूंमुळे कोंडा, पुरळ आणि संसर्ग उद्भवतो. थोडक्यात हिवाळ्यात केसांना इजा पोहोचते. ते शुष्क व अधिक कुरळे होतात. दुभंगलेली टोकं आणि केस तुटणं या  समस्येमुळे केस गळतात यामुळे थंडीत केसांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

केसांसांठी आहार

  • हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा कमी होऊन आरोग्य सुधारण्यासाठी डोक्याचं रक्ताभिसरण वाढण्याची गरज आहे. रक्ताभिसरण वाढण्यासाठी सुकामेवा खाणं फायदेशीर ठरतं. सुक्यामेव्यात असलेल्या पोषक गुणधर्मामुळे केस दाट, मऊ आणि मजबूत व्हायला मदत होते.
  • केसांसाठी जीवनसत्त्व ई पोषणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. पाच बदाम आणि 1-2 अक्रोड नियमितपणे खावेत. यामुळे केसांना चकाकी येते.

मसाज

  • आठवड्यातून 2-3 वेळा खोबरेल तेल, एरंडेल तेल किंवा बदामाच्या तेलाने मालिश करावे..
  • अतिगरम पाण्यामुळे केस कमकुवत होऊन ते तुटण्याची शक्यता वाढते. अतिगरम पाण्याचा वापर टाळावा.
  • केसांचं आणि टाळूचं नैसर्गिक पोषण भरून काढण्यासाठी टाळूवर बदाम, जोजोबा किंवा रोजमेरी तेलाने मालिश करू शकता. आठवडयामध्ये एकदा ऑलिव्ह तेल वापरणं फायदेशीर असतं. गरम तेलामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारतं. टाळूमध्ये आर्द्रता राखण्यासाठी रात्रीच्या वेळी किंवा धुण्यापूर्वी तीस मिनिटं केसांना तेल लावणं उपयुक्त ठरतं.

अशी घ्या काळजी

  • केसात कोंडा असल्यास गरम तेलामध्ये लिंबाचा एक चमचा रस मिसळून रात्री हे मिश्रण केसांना लावा आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुवा.
  • टी-ट्री ऑइलमध्ये खोबरेल तेल मिसळून ते केसांना आणि त्याच्या मुळांना लावा.
  • आंघोळीच्या आधी कोरफडीच्या रसाने किंवा लिंबाच्या रसाने केसांना मसाज केल्यास कोंडा निघून जाण्यास मदत होते.
  • कोरड्या केसांमुळे गुंता होतो. गुंता सोडवण्यासाठी विंटेज कंगवा वापरा. या दिवसांत केस पूर्ण वाळल्यानंतरच वेणी किंवा बुचडा घालावा. ओल्या केसांना बांधून ठेवले तर त्यामध्ये उवा होण्याची भीती असते. कारण ओल्या केसामध्येच उवा होतात.
आपली प्रतिक्रिया द्या