आटोपतं घ्यायला हवं!

177

<< टिवल्या – बावल्या>>   << शिरीष कणेकर >>

माझी मासूम जवानी जोश पे थी तब की बात (कोणी पाहिल्येय? फेका काहीही. माझ्या दोन वर्षांच्या नातीला विचारलं की काय करत्येयस, तर ती सांगते की मी फेका मारत्येय. यंव रे पठ्ठी! पुढेमागे ऑलिम्पिकमध्ये ‘फेकाफेकी’त सुवर्णपदक मिळवेल. तिचे आजोबा महान फेकाडे होते असं जग कौतुकानं म्हणेल). म्हणजे, कधीची गोष्ट सांगू का? तैमुरलंगनं हिंदुस्थानवर स्वारी केली किंवा गजनीच्या  महंमदान सोमनाथाचं देऊळ लुटलं किंवा सीतेने रामापाशी हरणाच्या कातडीची चोळी करण्याचा हट्ट धरला किंवा अल्लाऊद्दीन खिलजीला आरशातून दर्शन द्यायला पद्मिनी तयार झाली किंवा शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली किंवा खाशाबा जाधवनं ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक पटकावलं किंवा मुंबईत प्रथम उडिपीचं उपाहारगृह निघालं किंवा महंमद निसार लारवूडच्या वेगानं गोलंदाजी करायचा किंवा रॉबर्ट क्लाइव्ह ‘ईस्ट इंडिया कंपनी’तर्फे मुंबई बंदरात उतरला किंवा खाली पाटावर जेवायला बसत होते किंवा चापेकर बंधूंनी रँडसाहेबाला भररस्त्यात गोळय़ा घातल्या किंवा माझे मित्र स्वतःच्याच घरी जेवायचे त्या काळातील गोष्ट जुनी गोष्ट. आपण पाकिस्तानला जेमतेम वीस हजारावा निषेध खलिता पाठवला होता तब की बात. साधारण काळ लक्षात आला ना? परीक्षेत कॉपी करण्याला मान्यता मिळाली नव्हती, नवऱयाशी भांडून माहेरी आलेल्या बायका स्वतःहून संसारात परतायच्या, टॅक्सीवाले हात केल्यावर थांबायचे, हॉटेलात चहाच्या भावात जेवण मिळायचं, गुन्हेगाराला त्याच्या हयातीतच शिक्षा मिळायची, पोरं बापाच्या शब्दाबाहेर नव्हती, ‘बलात्कार’ हा शब्द केवळ शब्दकोशात होता, घरी आलेल्याला चहा विचारायची पद्धत होती, नेत्यांना मान होता, हनीमूनला देशाबाहेर जायचं या कल्पनेचाही जन्म झाला नव्हता, पोरी लाइन देत नव्हत्या, शाळेत शिकवत होते, पोरांना पॉकेटमनी मिळत नव्हता, टॅम होती, पीठपोळी आणि तेलपोळी तसेच पुलाव व बिर्याणी यांना एकच समजत नव्हते, पाळलेल्या कुत्र्याशी इंग्रजीतून बोलत नव्हते, वृद्धांना ‘सीनियर सिटिझन्स’ म्हणत नव्हते, सिनेमाच्या पडद्यावर महात्मा गांधींचा पुतळा दिसला की प्रेक्षक टाळय़ांचा कडकडाट करायचे, सी. के. नायडूहून मोठा फलंदाज या देशात होईल असं वाटत नव्हतं, चौपाटीवर जाऊन आईस्क्रीम खाणं ही चैन होती, घरची गाडी असणं ही सुपर चैन होती, एक दिवस ठरवून मुली शाळेत साडी नेसून यायच्या, गल्लोगल्ली भोंडले व्हायचे, बाबांना पगारवाढ मिळाली की ते इराण्याकडून मावा केक घेऊन यायचे आणि आई नववारी नेसून नथ घालायची, पाय मुरगळला तर घरगुती लेप लावत, गारांचा पाऊस पडायचा, रात्री आजीकडून झोपण्यापूर्वी कोकणातल्या भुतांच्या गोष्टी ऐकून भीतीही वाटायची आणि मजाही यायची, इंग्रजी व्याकरणाच्या तर्खडकरांच्या पुस्तकांना टेकून काही पिढय़ा उभ्या होत्या, घरच्या स्त्र्ाया नाटकांना जात नव्हत्या, आई गेल्यावर खूप रडू यायचं आणि येतच राहायचं तो काळ!

तो काळ गेला आणि तरीही आम्हाला खायला उठला. नवीन काळाशी जुळवून घेताना आमच्या तोंडाला फेस आला. ‘सेल्फी’ कशासाठी काढायचा आणि त्यावेळी ओठांचा चंबू कशासाठी करायचा हे आजही मला प्रयत्न करूनही कळत नाही. चांगली नवीन धडकी जीन गुडघ्यावर मुद्दाम का फाडायची व त्याला स्टाइल का म्हणायचं, तरण्याताठय़ा पोरींनी एक खांदा उघडा टाकणारा अंगरखा का घालायचा, पार्टी हॉटेलातच का करायची व कुठलीही पार्टी दारूशिवाय का होऊ शकत नाही, देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात लग्न करून खुशाल जाणाऱ्या मुलींच्या जागी आता एका मुंबईत सेंट्रल रेल्वेवरचा मुलगा नाकारणाऱ्या वेस्टर्न रेल्वेवर मुली कशा आल्या, सगळंच ‘इव्हेंट मॅनेजमेंट’वाले करायला लागले तर माणसं काय करतात?’ ‘कॅटरर’नं दिलेली लग्नाच्या ‘बुफे’तली जेवणं सगळी सारखीच का वाटतात, मिसरूडदेखील न फुटलेल्या पोरांना पंचवीस आणि तीस हजारांचे मोबाईल कसे परवडतात, नवरे कमरेला खोचायचे हातरुमाल कधी झाले व कुकरची शिटी बंद करायला कधीपासून धावायला लागले. आजी-आजोबा अडगळ कधी झाले व फिदीफिदी हसत त्यांचा उल्लेख ‘डस्टबिन’ असा केव्हा व्हायला लागला, देवावरचा अभिषेक कॉम्प्युटरवर पाहून मनाला समाधान कसं मिळतं, माघारी आलेली मुलगी जास्तच कशी मिरवायला लागली, बडा पगारदार मुलगा घरी आला की बाप उठून कसा उभा राहायला लागला, महिन्याचा पगार सहा आकडी कधी झाला, मराठी इंग्रजीतून कसे बोलायला लागले, प्रत्येकाचं कोणी न कोणी फॉरेनला कसं काय असायला लागलं, उपासाच्या दिवशी कोल्ही-कुत्री खाल्ल्यानं पाप कसं काय लागेनासं झालं, उपासाला दारू चालते हा शोध कोणी व कधी लावला, मुला-मुलींची अर्थहीन नावं ठेवण्याची प्रथा कधी सुरू झाली, बापाच्या अस्थी बाल्कनीत टांगून ठेवणारा आमचा पत्रकार सहकारी पहिला असेल पण तो शेवटचा आहे का, नवीन पिढीला ‘मेलडी’ची ‘ऍलर्जी’ का आहे, लहान मुलांची भाषणे का असतात, लेखक आपल्या पुस्तकांच्या संख्येवरून स्वतःच स्वतःचं महत्त्व व मोठेपण कधीपासून ठरवायला लागले, कुत्र्यांच्या बरोबरीनं मालकही का भुंकायला लागले, नवऱ्यांना मुके प्राणी का म्हणत नाहीत…

काळ बदलला. आमच्यासाठी तरी बदलला. या बदलांच्या मागे धावता धावता दमछाक होते. छातीचा भाता होतो. कुठंतरी निवांतपणे क्षणभर टेकावं असं वाटतं, पण काळ वाघासारखा मागे लागलाय. आता काय म्हणे ‘व्हॉट्स अॅप’वर बोलणारा माणूस दिसतोदेखील. उद्या टेलिफोनमधून तो समोर येऊन उभा राहील. भिरभिरायला होतं. आम्ही तो काळ पाहिलाय की जेव्हा पुण्याहून मुंबईला ‘ट्रंक कॉल’ करायचा झाला तर ज्याच्याकडे फोन आहे त्याच्याकडे जावं लागायचं. नंतर नंबर लागायची वाट पाहत कितीही वेळ थांबायला लागायचं किंवा घरी जाऊन परत यावं लागायचं. शास्त्रानं वायुवेगानं प्रगती केली. आम्ही मागेच रेंगाळलो. साधा मोबाईल वापरता येत नाही? पोरं डाफरतात, गेलेल्या काळाबरोबर आपण मागेच संपून जायला हवं होतं, हा विचार मनात प्रबळ होतो. आपलं इथं काही काम नाही. जशी जुनी केराची टोपली तसे आपण, आटोपतं घ्यायला हवं काय?…

shireesh.kanekar @gmail.com

 

आपली प्रतिक्रिया द्या