टिवल्या-बावल्या- मधु(र)बाला

शिरीष कणेकर  <<[email protected]>>

हॉलीवूडला जशी मेरलिन मन्रो तशी आपल्या बॉलीवूडला मधुबाला!

नाही, फरक आहे. मन्रोचा चेहरा सुंदर होताच (पण एलिझाबेथ टेलर, सोफिया लॉरेन, ग्रेस केली यांच्याइतका नाही), पण तिच्या देहयष्टीनं तिला प्रेक्षकांची जानेमन बनवले होते. ती प्रत्येक अमेरिकन पुरुषाची ‘फँटसी’ होती. मधुबालाच्या काळात ‘फिगर’ला आजच्या इतपं व आजच्या सारखं महत्त्व नव्हतं. ‘झीरो फिगर’ हे शब्दही कोणी ऐकले नव्हते. एरवी नलिनी जयवंतपासून अमितापर्यंत अनेक गोड चेहऱ्याच्या गुटगुटीत नायिका आल्याच नसत्या. त्यात नुकसान आपलंच झालं असतं.

मधुबालाला ‘व्हीनस’ म्हणत. सौंदर्यदेवता. तिच्या चेहऱ्यावरून नजर हटेल तेव्हा ना अन्य गोष्टींकडे लक्ष जाईल! ती मीनापुमारीपेक्षा प्रमाणबद्ध होती. मुख्य म्हणजे तिला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव होती. समोरचा बघताक्षणी कसा घायाळ होतो हे जाणून होती. शिवाय कोणीसं म्हटलंच आहे ना, की ‘हुस्न आया तो नजाकत आ ही जाती है’. म्हणून ‘संगदिल’मध्ये दिलीप पुमार तिच्याकडे पाठ करून संवाद बोलायला लागला की, या सौंदर्याच्या खाणीचं डोपं तापायचं. माझी उपेक्षा? प्यारे की हर चीज प्यारी होती है. म्हणून दिलीप पुमारच्या नाठाळपणाचीही आम्हाला गंमतच वाटत आल्येय. दिलीप पुमार व मधुबाला या प्रणयपाखरांना पडद्यावर एकमेकांवरून जीव ओवाळून टाकताना पाहून काळजापाशी ठंडक पोहोचायची तशी, माफ करा, पण दुसऱ्या कोणत्याही जोडीनं पोहोचवलेली नाही. राज कपूर-नर्गिसनं नाही की अमिताभ-रेखानं नाही. देव आनंद व मधुबाला यांनी ‘निराला’, ‘नादान’, ‘आराम’, ‘जाली नोट’, ‘शराबी’ व ‘काला पानी’ असे सहा चित्रपट एकत्र केले, पण त्यांची ‘केमिस्ट्री’ जमली नाही. पडद्यावरचा सर्वात देखणा पुरुष व पडद्यावरची सर्वात देखणी स्त्री यांना एकमेकांवर प्रेम करताना पाहण्यात प्रेक्षकांना का रुची वाटली नाही हे अनाकलनीय आहे. ‘अच्छा जी मै हारी चलो…’ म्हणत ती देव आनंदची मनधरणी करते तेव्हा मन असूयेने भरून येतं. ‘टुटी फुटी गाडी, अनाडी चलैय्या’ (लता – सी.रामचंद्र) मधुबाला ‘निराला’मध्ये म्हणते ते बघा, बघतच राहाल! मधुबालाच्या अदा लाजवाब आहेत. मुख्य म्हणजे त्या तिला विलक्षण शोभतात. ड्रायव्हर म्हणून निःशब्द बसलेला देव आनंदही तिला शोभतो  ‘महल’मध्ये ती साक्षात अप्सरा दिसते. त्या गूढरम्य वातावरणात तिचं खानदानी मुस्लिम सौंदर्य जास्तच खुललंय. म्हणूनच ‘आयेगा आनेवाला’, ‘मुश्किल है बहोत मुश्किल’, ‘दिलने फिर याद किया’ ही लताच्या तोंडची खेमचंद प्रकाशची गाणी जास्तच अंगावर यायची.

मधुबाला 14 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मली व अवघी छत्तीस वर्षांची असताना 23 फेब्रुवारी 1969 रोजी देवाघरी गेली. तिच्या हृदयाला छिद्र होतं. त्या काळी तो असाध्य रोग मानला जायचा. तिच्या नाकातोंडातून रक्त यायचं. ती सेटवर बेशुद्धही व्हायची. काही तासांनी तिला ऑक्सिजन द्यावा लागे, पण या सगळ्याची तिनं वाच्यता केली नाही. ‘मुगले आझम’मध्ये जड साखळदंड तिला उचलवत नसत, पण तोंडातून तक्रारीचा शब्द काढला नाही. त्या काळचा विख्यात हृदरोगतज्ञ डॉ.बालिगा व माझे वडील डॉ. कणेकर मधुबालाला उपचारार्थ इंग्लंडला घेऊन जाणार होते. कुठं बिनसलं कळायला मार्ग नाही. ती गेली असती तर कदाचित आजही आपल्यात असती, पण जख्ख म्हातारी, सुरकुतलेली, कमरेत वाकलेली, कान फुटलेली, जाड काचांचा चष्मा लावणारी, मान डुगडुगणारी अशी मधुबाला आपण डोळ्यांपुढे आणू शकत नाही, आणू इच्छित नाही. मधुबाला मस्ट डाय यंग!

दिलीप कुमारशी तिचं लग्न होऊ शकलं नाही, तिथंच तिची घसरण सुरू झाली. ‘‘माझी मुलगी तुझ्या बहिणींच्या साडय़ा धुवायला येणार नाही’’ अशी अतार्किक दर्पोक्ती मधुबालाचा बाप अताउल्लाखान यानं दिलीप कुमारपाशी केली. ‘नया दौर’च्या शूटिंगसाठी मधुबालाला दिलीप कुमारसमवेत चाळीस दिवसांसाठी भोपाळला जाऊ देण्यास अताउल्लाखानने मनाई केली. संपलं… मधुबाला ‘नया दौर’मधून व दिलीप कुमारच्या आयुष्यातून बाहेर पडली. किशोर कुमारला धर्म बदलायला लावून त्याच्याशी केलेलं लग्न हा फुसका बार ठरला.

अखेरच्या काळात तिची अवस्था केविलवाणी झाली होती. सौंदर्य झडलं होतं. देहाची लक्तरे झाली होती. डोकं सैरभैर झालं होतं. खोलीतला आरसा तिनं हटवला होता. दिवे काढून टाकले होते. दारं खिडक्यांना काळे पडदे लावून घेतले होते. ती स्वतःला पाहू इच्छित नव्हती व दुसऱ्या कोणी आपल्याला पाहावं असं तिला वाटत नव्हतं. मरणाआधीच तिनं स्वतःला मारलं होतं. एकदा तिनं वहिदा रेहमानला घरी बोलावून घेतलं व स्पष्ट बजावलं, ‘‘माझ्या युसुफला सोड. त्याला नादी लावू नकोस. पुढल्या महिन्यात आम्ही लग्न करणार आहोत.’’

वहिदा रेहमान काही न बोलता तिथून पळाली.  दिलीप कुमारनं सायराशी लग्न केल्यानंतर त्याला मधुबाला एकदा अपघातानं भेटली. वेडय़ासारखं कडूशार हसत ती दिलीप कुमारला म्हणाली, ‘‘चलो, आखिर आपके आपकी शहेजादी मिलही गयी.’ आत्ता आत्तापर्यंत दिलीप कुमार नियमीतपणे मधुबालाच्या कबरीवर जात होता. आता तो ‘गंगा जमना’त शेवटी म्हणतो तसं झालंय – ‘‘खतम होई गवा…सब पुछ खतम होई गवा…’’

आपली प्रतिक्रिया द्या