तिवरे ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सिद्धिविनायक न्यास घेणार

28

सामना ऑनलाईन, मुंबई

दुर्घटनाग्रस्त तिवरे गावाच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासने घेतली आहे. त्यासाठी एका भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनाथ गतिमंद मुलांच्या संगोपनाची जबाबदारीही श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास घेणार आहे. त्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले. याबाबतचे दोन्ही प्रस्ताव आता शासनमान्यतेसाठी पाठवण्यात आले आहेत.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण 3 जुलै रोजी रात्री फुटले. या दुर्घटनेत तब्बल 24 जण वाहून गेले. त्यापैकी 19 मृतदेह हाती लागले. अनेकांचे संसार उघडय़ावर आले. घरे वाहून गेली. होत्याचे नव्हते झाले. या गावाचे पुन्हा पुनर्वसन करण्याचा, घरे आणि शाळा जशाच्या तशा उभारण्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यासने घेतला आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी त्याबाबतचे पत्र श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या विश्वस्त मंडळाला दिले होते. त्यांची ही मागणी आज झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आली. तसेच गतिमंद मुले अनाथ झाल्यानंतर त्यांना सांभाळण्याची जबाबदारी कुणीच घेत नाही. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठीही भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आदेश बांदेकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या