टिवल्या बावल्या – शिकून कुणाचं भलं झालंय!

113

 शिरीष कणेकर

डतर, जिकिरीचं व अंगावर काटा आणणारं शालेय शिक्षण मी कसं पूर्ण केलं याचा चित्तथरारक, विदारक, हास्यकारक, किळसवाणा व अविश्वसनीय वृत्तान्त तुम्ही वाचलातच. त्या अनुभवानंतर तरी मी कॉलेजच्या वाटेला फिरकायला नको होतं. खरं म्हणजे शिक्षण हे आपले क्षेत्र नव्हे हे एव्हाना मला व सगळय़ांनाच कळलं होतं. सचिन तेंडुलकरसुद्धा फारसा शिकला नव्हता. (पण हे उदाहरण तेव्हा नव्हतं.) हिटलर कुठं शिकला होता. (हे उदाहरण तेव्हा होतं पण देत नव्हते.) चर्चिल कुठं शिकला होता. (हे उदाहरण माहीत असायला इतिहास माहीत नव्हता.) जिथं अभ्यास होता तिथं मी नव्हतो. असो.

घरच्यांनी माझ्यापुढे दोन पर्याय ठेवले – कॉलेजात जाऊन पुढे शिकायचं किंवा पोटापाण्याच्या मार्गाला लागायचं. पोटापाण्याचा मार्ग म्हणून त्यांनी त्यांच्या मते माझ्या योग्य असलेले काही व्यवसाय माझ्यासमोर ठेवले. उदाहरणार्थ, टॅक्सी चालवणं, कपड्यांना इस्त्री करून ते घरोघरी पोहोचवणं, पानाचा ठेला टाकणं, पावसाळ्यात छत्र्या रिपेअर करणं व पावसाळा संपल्यावर रस्त्यात हातगाडीवर कणसं, केळी किंवा ताडगोळे विकणं, ‘पार्किंग लॉट’मध्ये गाडीवाल्यांना गाडी नीट पार्क करायला मदत करणं, लिफ्ट चालवणं, ऑफिसात युनिफॉर्म घातलेला शिपाई होणं, विमानतळावर व्हीलचेअर ढकलणं, बिल्डिंगचा वॉचमन होणं, शेतमजूर होणं, पेट्रोल पंपावर काम करणं, किराणा मालाच्या दुकानात पुड्या बांधणं, केशकर्तनालयात झाडू मारून जमिनीवर पडलेले केस गोळा करणं, मटक्याचं बुकिंग घेणं, पुरुष बोहारीण होणं, रद्दीवाला किंवा भंगारवाला होणं, रफ्फूकाम करणं, फुटपाथवर बसून कान कोरणं, रस्त्यावर कुलपांच्या चाव्या बनवून देणं, टायरचं पंक्चर काढणं, जाहिरातींची पत्रकं वाटणं, पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणं, मोबाईलची कव्हर्स व की-चेन्स विकणं, फळीवर गाळण्या, पेन्सिल शार्पनर, कंगवे ठेवून विकणं, जास्त वजन झालेली भाजी स्त्री गिऱ्हाईकांबरोबर जाऊन घरपोच देणं इत्यादी.

पोटापाण्याच्या मार्गाला लागण्याचे मार्ग मला पुढील शिक्षणापेक्षा सुसह्य वाटले. शिवाय चार पैसे हातात खेळायला लागले असते. (नापित व चर्मकार या दोन व्यवसायांना वैयक्तिक धंदेवाईक नैपुण्य लागतं म्हणून घरच्यांनी ते आधीच बाद ठरवले होते. तीच गोष्ट ट्रफिक कॉन्स्टेबलची व कुक्कुटपालनाची!) स्वतःच्या कमाईनं गल्लीतल्या अमृताला गजरा घेऊन देऊ शकलो असतो. माजोरड्या अमृतानं तो फेकून दिला असता तर तोच उचलून माधवीला दिला असता. ती नाही तरी वैदेही होतीच. म्हणून मला गजरा आवडतो. कोणाच्याही केसात माळून घ्यायला बिचारा तयार असतो. नवऱ्याप्रमाणंच गजऱ्यासाठी स्वतःचं असं मत नसतं. म्हणून विवाहित पुरुषांना गजऱ्याविषयी ममत्व असतं. मग तो गजरा ते कामवालीला का देईनात.

कॉलेजमध्ये मला सगळ्यात जर कुठली गोष्ट आवडली असेल तर ती म्हणजे वर्गात तासाला बसणं कंपल्सरी नव्हतं, मग मी कशाला बसतोय! नाही तरी वर्गात बसून तरी काय फतरे कळणार होतं! शाळेत बसतच होतो की वर्गात. काय कळलं? इथे तर सगळे विषय इंग्रजीतून शिकवत. हा काय चावटपणा? मुळात इंग्रजी शिकायला आम्ही या प्रौढ वर्गात आलोय ना! मग इंग्रजीत शिकवलेले अन्य विषय आमच्या डोक्यात कसे शिरणार? अन् स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरी इंग्रजीची गुलामगिरी करीत राहायचं? कुठे गेला तुमचा हिंदुस्थानी बाणा? लोकमान्य म्हणाले होते, ‘‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही!’’ मीदेखील कॉलेजच्या कॅण्टीनमध्ये म्हणालो, ‘‘मी आता पारतंत्र्यात नाही, मी इंग्रजीचं जोखड मानेवर घेणार नाही!’’ भगतसिंग, आझाद, राजगुरू आणि मी या देशासाठी रक्ताचे सडे घातले ते काय गिर्वाणभाषा इंग्रजीतून शिकण्यासाठी? थुत तुमच्या जिंदगानीवर. जाज्वल्य देशप्रेमाचा स्फुल्लिंग चेतवणाऱ्या निषेधातून मी सहामाहीचे सर्व पेपर्स कोरे दिले. माझे परीक्षेतील सर्व मार्क (म्हणजे शून्य) कॉलेजनं घरी कळवले. तेही इंग्रजीतून. एवढी तत्परता कॉलेजनं दाखविण्याची काय गरज होती? माझा अलौकिक ‘ढ’पणा माझ्या घरच्यांना काय माहीत नव्हता? मी पास झालो असतो तर त्या धक्क्यातून ते कदाचित सावरले नसते. पण ज्याला देशाविषयी एवढी तळमळ आहे त्याला घरच्यांची काळजी नसेल? मी बरा त्यांना धक्का देईन.

त्यानंतर मी त्यातल्या त्यात (म्हणजे माझ्यापेक्षा) हुशार मुलाला आम्हाला अभ्यासासाठी असलेले विषय विचारून घेतले. त्यात एक ‘सोशॉलॉजी’ हा होता. ‘सोशॉलॉजी’ म्हणजे नागरिकशास्त्राची तेवढीच कळकट धाकटी बहीण. तेवढीच अनाकलनीय व तेवढीच कंटाळवाणी. विषयाशी तादात्म्य पावणारी मिस कुटीनो (म्हणजे कळकट व कंटाळवाणी) आम्हाला ‘सोशॉलॉजी’ शिकवायची. कशी गोडी लागावी विषयात! वातावरणनिर्मितीसाठी व विद्यार्थ्यांच्या नेत्रसुखासाठी एखादी सुंदर मुलगी शिकवताना मिस कुटीनोनं शेजारी बसवावी ही माझी सूचनाही अव्हेरली गेली व उलट मलाच खरमरीत शब्दांत लेखी ‘वॉर्निंग’ देण्यात आली. कशी सुधारणार या देशातील शिक्षणपद्धती! मी एकटा काय काय करू! इंग्रजीचा नायनाट करू की शिक्षणपद्धती सुधारू? ‘तू फक्त पास हो’ घरचे म्हणाले. माझे उच्च ध्येय समजून घेणं त्यांच्या आवाक्यापलीकडचं होतं. मध्यमवर्गीय पुचाट कुटुंबात ‘भगतसिंग’ जन्माला आला होता.

लवकरच माझ्या लक्षात आलं की, नोकरीधंदा टाळण्यासाठी, किमान जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्यासाठी शिक्षण चालू ठेवणं हा एकमेव मार्ग होता. शिवाय त्याला वजनदार समाजमान्यताही होती. ‘तो शिकतोय’ असं म्हटलं की वळवळणाऱ्या जिभांना चिमटा लागतो. काय एवढं शिकतोय कोण जाणे असं नातलगपातलग दबल्या ओठांनी पुटपुटतात. आपण आपलं शिकत राहायचं. आपसूक चेहऱ्यावर शिक्षणाचं व विद्वत्तेचं तेज येतं. लोकांकडे तुच्छेतेनं बघण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. शिक्षण नसतानाही तो मी स्वतःकडे घेतलाच होता म्हणा.

मी ‘लॉ’ला ऍडमिशन घेतली. म्हटलं पाचपंचवीस वर्षे यात आरामात जातील. पुढचं पुढं. मी बॅरिस्टर होईन. मग कोपऱ्या वरचा सलूनवाला मला आदबीनं विचारील, ‘‘या बॅरिस्टरसाहेब, कसे कापू केस?’’ फुकट्यापासून बॅरिस्टरपर्यंत ही प्रगती चहावाल्यापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रगतीपेक्षा कुठंही कमी नाही.

विद्याभ्यासातील माझी गती पाहता मी बॅरिस्टर होईपर्यंत इतका काळ जाईल की त्यानंतर लगेचच मी रिटायर होईन.

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या