स्टेजवरचे ते दिवस

शिरीष कणेकर

जवळपास दहा वर्षांनी मी नाट्यगृहात जाऊन नाटक पाहिलं. (तशी आमच्याकडे व शेजारीपाजारी चालणारी नाटकं कितीही मनोरंजक असली तरी ती इथे जमेस धरलेली नाहीत). शिवाजी मंदिरमधला आमूलाग्र बदल (म्हणजे फक्त खुर्च्या बदलल्यात) मी प्रथमच पाहत होतो. तिथल्या रंगमंचानं दीर्घकाळ माझं पदलालित्य अनुभवलं नव्हतं. माझ्या पदस्पर्शानं तो पावन झाला नव्हता. नाट्यगृह अजून कसं चालवत होते कोण जाणे! कर्तव्यभावनेतून असावं. माझ्यासारख्या महान कलावंताला गमावल्यावर वास्तविक त्यानं उन्मळून पडायला हवं होतं.

मी खुर्चीत स्थानापन्न झालो. आत जात असलेल्या बाळूची व माझी नजरानजर झाली. तो ओळखीचं हसला व लांबूनच म्हणाला, ‘‘पहिल्या अंकानंतर शुगर फ्री चहा आणतो.’’

fhatkebaji

मी कमालीचा सुखावलो. दहा वर्षांनंतर कँटीनवाल्या बाळूनं मला लक्षात ठेवलं होतं, इतकंच नाही तर मला कसा चहा लागतो हेही तो विसरला नव्हता. मी पटकन पोपटासारखी मान वळवून आजूबाजूच्या प्रेक्षकांकडे एक विजयी कटाक्ष टाकला. माझी वट त्यांनी पाहिली असणार. त्यांच्या चेहऱ्यावरून तरी तसं काही दिसलं नाही. अरे, कोणा ऐऱ्यागैऱ्याला बाळू असं विचारेल का? नानासाहेब फाटक, गणपतराव बोडस, मा. दत्ताराम, मामा पेंडसे, दत्ता भट, सतीश दुभाषी, पु. ल. देशपांडे, मी… आम्ही रंगभूमीसाठी व रंगमंचावर रक्त ओकलंय. गणपतराव जोशींप्रमाणे माझ्याही कानात (मी प्यायलेलो नसताना) सांगायचे, ‘‘आज ‘फिल्लमबाजी’ आहे बरं का!’’ मग मी बेधुंद सुटायचो. आता छोट्या-मोठ्या तुकडोजी कलाकारांना आम्ही गाजवलेल्या रंगमंचावर गोंधळ घालताना पाहिलं की, अंगावर काटा येतो. जिथं फुलं वेचली तिथं गवऱ्या काय वेचायच्या…

मी विंगेतून शिवाजी मंदिरच्या रंगमंचाकडे ओढाळ नजरेनं एकवार पाहिलं. प्रेयसीबरोबर नेहमी बसायचो त्या ‘कॉफी शॉप’मधल्या कोपऱ्यातील विशिष्ट टेबलाकडे बघावे तसे. ‘शो’ सुरू झाला नाही तोच मला प्रेक्षकांच्या हवाली करून (पक्षी : तोंडी देऊन) माझी टीम खादाडीला बसायची. पुण्यात ‘टिळक स्मारक मंदिरा’त ‘कणेकरी’च्या दुसऱ्या प्रयोगाला मी ‘ब्लँक’ झालो तेव्हा माझी टीम आईस्क्रीम खायला गेली होती. अशी टीम गोळा करणारा मीच नादान नव्हतो का? आईस्क्रीम खातायत xx xxx! आजही या लयाला गेलेल्या भूतपूर्व टीममधलं कोणी भेटलं तर मला सुरसुरी येते की, खंडोबल्लाळाचे जसे राखेनं भरले होते तसे माझ्या टीमचे आईस्क्रीमनं तोबरे भरावेत आणि वरून लाल मुंग्या सोडाव्यात.

माझ्या शिवाजी मंदिरच्याच एका प्रयोगाला पद्मा चव्हाण आली होती. बिचारी तिकीट काढून गुपचूप आली होती. तिला काय फुकट सीट मिळवणं अवघड होतं? पण नाही, काही लोक प्रिन्सिपलवाले असतात. भक्ती बर्वे अशीच तिकीट काढून यायची. वंदना गुप्तेही फुकट येत नाही म्हणे. या यादीत पुरुष असले तरी मला माहीत नाही. मी स्वतः नक्कीच नाही. हॉटेलात डोशाबरोबर एक्स्ट्रा चटणी फुकट मिळते म्हणून तीदेखील परत परत मागून खाणारे आम्ही.

kanekari

माझी घोर पंचाईत झाली. प्रयोगात मी एका ठिकाणी म्हणतो, ‘पद्मा चव्हाणला महाराष्ट्राची मेरिलिन मन्रो म्हणतात असं तिकडे अमेरिकेत मन्रोच्या कानावर गेलं म्हणून ना तिनं आत्महत्या केली?…’ आता काय करू? चारचौघांसारखी ती तिकीट काढून आली होती. तिचीच तिच्या तोंडावर टवाळी करू? तिनं एकवेळ माझं पचकणं खिलाडूपणे घेतलं असतंही, पण प्रेक्षकांनी तिला सहजासहजी सोडलं नसतं. तिच्यासमोर येऊन वाकून तिच्या तोंडाकडे बघत तोंडातून चित्रविचित्र आवाज काढले असते. तिच्या अपमानाचा खुंटा हलवून बळकट केला असता. बरं, त्यावर मी कोणत्या अधिकारात बोलणार? मीच त्यांना उचकवलं होतं. माझ्या डोक्यात मायकेल जॅक्सन थैमान घालत होता. काय करावं मला सुधरत नव्हतं. समोर एखाद्या संस्थानिकाच्या राणीच्या रुबाबात पद्मा चव्हाण बसली होती. तिच्याकडे न बघण्याचं ठरवूनही नजर वारंवार तिच्याकडेच जात होती. तोंडानं मी कार्यक्रमाचं बोलत होतो. पण माझं लक्ष ‘त्या’ वाक्याकडे लागलं होतं. खरं सांगतो, शेवटी मी ते बोललो की नाही हेच मला आठवत नाही. पण परिस्थितीजन्य पुरावा पाहता मी टरकून न बोलण्याची शक्यता जास्त वाटते. तसा मी पुचाट आहे. पद्मा चव्हाणनं माझ्या कानाखाली एक आवाज काढला असता तर मी थेट मेरिलिन मन्रोला भेटायला गेलो असतो. नॉट बॅड, आय से!

जे थोडे गुणी कलाकार राहिलेत तेही तुम्हाला हेच सांगतील की शिवाजी मंदिरात काही त्रुटी असोत, तिथे जेवढा प्रयोग रंगतो तेवढा कुठेही रंगत नाही. दीनानाथ, गडकरी, रवींद्र, दामोदर, कालिदास, प्रबोधनकार ठाकरे, साहित्य संघमंदिर… कुठेही नाही. रवींद्रमधून बाहेर पडणारे प्रेक्षक वाहनशोधाच्या जिकिरीनं जेरीस येतात. संघमंदिर हे एकेकाळी मुंबईतील प्रमुख नाट्यगृह म्हणून गणले जायचे. पुढे त्याला अवकळा आली. गिरगावातील मराठी माणसं कमी झाली हे संघमंदिराच्या अवमूल्यनाचं कारण दिलं गेलं. मी तिथं एक महोत्सवी प्रयोग केला. जीतेंद्र मूळ गिरगावातला म्हणून त्याला प्रमुख पाहुणा केला. मध्यांतरात त्याला भेटायला तीन-चार टक्कल व दात पडलेले म्हातारे आत ‘ग्रीनरूम’मध्ये आले. ते जीतेंद्रचे शाळासोबती होते. त्यांच्याव्यतिरिक्त नाट्यगृहात २०-२५ प्रेक्षक होते. मी नाइलाजानं संघमंदिराला कोपरापासून नमस्कार केला.

…आणि आता दहा वर्षांनंतर मी रंगमंचावर नाही तरी नाट्यगृहात प्रेक्षक म्हणून बसलो होतो. आनंद इंगळे व संजय मोने हे माझे दोन मित्र नाटकात होते (म्हणून तर मी आलो होतो). माझा तिसरा मित्र अतुल परचुरे रेकॉर्डेड अनाऊन्समेंट करीत होता. एकाएकी माझ्या कानांना दडे बसले. मला माझ्या कार्यक्रमाची अनाऊन्समेंट ऐकू यायला लागली, ‘रंगदेवतेला अभिवादन करून व ऊर्मिला मातोंडकरचं स्मरण करून…’ आम्ही सहर्ष सादर करीत आहोत.

शिरीष कणेकरकृत एकपात्री धुडगुस…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या