कळी रुतते आमच्या गळी

  • शिरीष कणेकर

प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक कै. विनय आपटे यांचे कनिष्ठ व अप्रसिद्ध बंधू विवेक आपटे यांनी चार खांद्यांची मदत घेऊन वाहून नेलेली ‘खुलता कळी खुलेना’ ही शोकमालिका अखेर एकदाची संपली. मालिका आधी संपते की मानसी आधी वेगळया प्रकारचे कपडे घालते ही जीवघेणी स्पर्धा मालिकेने निर्विवादपणे जिंकली. सर्वेसर्वा असलेली आजी गणपतीला जावं तशी उठून गावी गेली ती गेलीच. ती का गेली ते आपणास ठावे आहे, असे नानूमामा मधूला सांगतो. ‘ए, मला सांग ना रे’ असे मधू मालिकेत व आपण घरी गयावया करीत असताना नानूमामा सांगत नाही. नानूमामा सांगेल या आशेवर मालिका संपल्यावरही मी अधूनमधून टी.व्ही. लावून बघत होतो. वेगळी चॅनेल्सही बघितली. विवेक आपटे यांच्या घरी जाऊन विचारावं का? तेही आजोळी त्याच गावी गेले नसतील ना? मानसीची आजीही गावी गेल्यावर परत येत नाही. दोन्ही आजींची गावं एकच असतील का? त्या दोघी मिळून बुद्धिबळ खेळत असतील का? हेच विश्वनाथन आनंदचं गाव असेल का? ही गावी पाठविण्याची भन्नाट आयडिया कोणाच्या खोपडीतून निघाली असेल?

बेबी ईशाच्या भाग्याला तोड नाही. आईनं अव्हेरलेल्या, बापानं न स्वीकारलेल्या ईशाचं मालिकाभर जे लाड, कोडकौतुक, संवर्धन होत असतं ते पाहून मातापित्यांचं छत्र नसणं किती छान असंच वाटत राहतं. काही प्रश्न – विक्रमचं ‘डिप्रेशन’ असं कसं जादूनं जातं? मोहन व गीता यांची पात्रे पुन्हा का बदलत नाहीत? मूग हा विक्रमचा बाप विजयचा आवडता पदार्थ आहे का, कारण तो कायम मूग गिळून बसलेला असतो. निर्मलाआत्या नवऱ्यासमवेत नांदत असते का? नानूमामा कमरेच्या पट्ट्याच्या जोडीनं मानेला ‘कॉलर’ का लावत नाही? (त्यामध्ये समोरचा किंवा स्वतःही बोलत असताना नानूमामाची मान ‘अवंदा पाऊस पडेल का?’मधल्या बैलासारखी सतत हलणार नाही) ईशाला प्रखर व निक्षून विरोध करणारा मोहन एकाएकी काही न घडता टोपी कशी फिरवतो? घराच्याच आवारात असलेलं विजयचं केमिस्ट शॉप हा विनोद कुणाचा? विजयच्या काही चोरट्या, छुप्या गोष्टी दाखवल्यात त्यांचं पुढे काहीच होत नाही हे प्रेक्षकांच्या लक्षात येणार नाही असं मालिकावाल्यांना का वाटलं? ईशाला शाळेत सोडायला व परत आणायला विवेक आपटे का जाताना दाखवले नाहीत? मालिका संपल्यावर मधू सईशी लग्न करतो का? आजीची भलीमोठी खोली रिकामीच आहे. सगळी काळजी आपटे आणि कंपनीनेच करायची का? मीही माझा खारीचा वाटा उचलतो आहे. ‘वांझोटी चर्चा करणारं, निक्रिय, मख्ख पात्र’ म्हणून यंदा विक्रमला पारितोषिक मिळायला हवं. ‘कसलाही निर्णय न घेणारी, सदा दुर्मुखलेली, गालावरची खळी दाखवणारी, चष्मेवाली, थंडात्मा’ म्हणून मानसीचाही पारितोषिकासाठी विचार व्हायला हवा. खुद्द विवेक आपटे व सहकाऱ्यांना ‘चऱ्हाट गाडगे’ हा किताब सन्मानानं देण्यात यावा. असो.

‘खुलता कळी खुलेना’चा ‘सिक्वेल’ ‘कळी रुतते आमच्या गळी’ हा लिहून तयार आहे. विवेक आपटेंसाठी (सॉरी, तेवढंच एक नाव माझ्या लक्षात राहिलंय) मी माझी सिद्धहस्त लेखणी झिजवली आहे. विक्रम व मानसी टपरीवरची कॉफी पितात तिथं मी त्यांना माझं स्क्रिप्ट देईन. नमूनेदाखल मी पहिला एपिसोड थोडक्यात सांगत आहे. त्यात बादलीभर पाणी घालून त्याचे पाच-सात एपिसोड कसे करायचे हे काय मी त्यांना सांगायला हवे?

बरीच वर्षे लोटलीत. दळवींचा बंगला आता ‘नकटीच्या लग्नाला’मधल्या ‘केळीवाल्या’ देशपांडेंच्या टेकू देऊन उभा ठेवलेल्या बंगल्यासारखा दिसायला लागलाय. बहुतेक पात्रं कालवश झालीत. भिंतीवर आजींचा फोटो आहे. सिंहाचं वगैरे मुंडकं लावतात तसं नानूमामाच्या डोक्याची प्रतिकृती भिंतीवर लावलीय. तेही मान डोलावतंय. मोहन-गीताचा थोरला मुलगा आता भप्पी लाहिरीसारखा दिसायला लागलाय. गीताकाकीचे सगळे दात पडलेत व ती दिवसभर त्या दातांनी सागरगोटे खेळत असते. विजय त्याच्याच दुकानातली औषधे खाऊन ती संपवत असतो. (महेश एलकुंचवारांचा प्रभाव कळतोय ना?)
मागच्या मालिकेत विक्रमच्या चेहऱ्यावरची माशी उडायची नाही. आता माशी बसतच नाही. यःकश्चित माशी झाली म्हणून काय झालं, तिला काही चॉइस आहे की नाही? ती मानसीच्या चेहऱ्यावर बसेल. विक्रम व मानसी दोघंही आता खूप थकलेत. स्त्रीरोगतज्ञ विक्रमच्या दाढीवाल्या चेहऱ्यावर ‘गायनॅकॉलॉजी’चं स्पेलिंग पाठ करून करून आलेला थकवा स्पष्ट दिसतोय. मानसी ईशाला भरवायला जाते त्याच वेळेला (कट् टू) …तीस वर्षांची ईशा आपल्या बॉयफ्रेंडला आइसक्रीम भरवत असते.

अखेर तिनं विक्रम व मानसीच्या लग्नाला परवानगी दिलेली असते. दरम्यान विक्रम व मानसीला दोन मुलं झालेली असतात. ईशाची परवानगी त्यांना लग्नासाठी हवी असे, मुलं होण्यासाठी नाही. वास्तविक ‘तुम्ही लग्न का करत नाही?’ असं (खोचकपणे) तिनं आधीच विचारलेलं असतं. पण नाही, त्यांना अधिक टिकाऊ परवाना तिच्याकडून हवा असतो. तिनं मोठी झाल्यावर संमती दर्शवायची असते. मोठी म्हणजे नक्की केवढी हे शेवटच्या एपिसोडमध्ये सांगितलेले नव्हते. आली का पंचाईत? ईशा कायद्यानं सज्ञान झाल्यावर आता हिला लग्नाची परवानगी विचारायची का, यावर विक्रम व मानसी ऊहापोह करतात. तो सुमारे एक तप चालतो. दरम्यान, मानसीला मुलं होत राहिल्यानं चर्चेत व्यत्यय येतो. अखेर तिशीची झाल्यावर ईशाची संमती विचारण्यात येते. ‘नो प्रॉब्लेम’ ती म्हणते. तिला वाटत असतं की हे आपल्याच लग्नाविषयी चाललंय. हा गैरसमज दूर करण्यात आणखी काही काळ जातो. लग्नावाचून आपलं काय अडलंय असंही विक्रम व मानसी यांना वाटतं. ईशानं चिवड्याच्या कागदावर लिहून दिलेली परवानगी निर्मलाआत्या ‘लॅमिनेट’ करून आणतात. एव्हाना त्या डिप्रेशनमध्ये जाण्याच्या बेतात असतात. विक्रमच्या मानसोपचार तज्ञ एकही पेशंट नसल्यानं स्वतःच डिप्रेशनमध्ये गेलेल्या असतात.

विक्रम व मानसी आपापल्या घरून विवाह नोंदणी कार्यालयात येतात. रजिस्ट्रारच्या टेबलवर ते लॅमिनेशन हार घालून ठेवण्यात येते. मानसीची साक्षीदार म्हणून सही करायला (नो प्रॉब्लेम’ ती म्हणते) ईशा जातीनं हजर असते. विक्रमच्या वतीने सलील (आठवतोय ना, नागपूरवाला?) असतो. सगळी जय्यत तयारी झालेली असते. ‘स्टार्ट’ असं रजिस्ट्रार क्रिकेट अंपायरप्रमाणे म्हणतो. गावोगावी, घरोघरी दर्शक टाळ्या वाजविण्यासाठी सज्ज होऊन बसतात. कॅमेरा गर्रकन फिरतो. नोंदणी कार्यालयाच्या दारावर तो स्थिरावतो. ढॅण्टॅs ढॅनsss तिथं मोनिका उभी असते.

इथे एक तासाचा पहिला भाग संपेल. पुढील संभाव्य शक्यता प्रश्नरूपानं उद्भवतील. इतक्या वर्षांनी अखेर कु. देशपांडे, सौ. दळवी होणार? त्यासरशी ईशा दळवी होणार? मोनिका काय डाव खेळणार? तिला पाहून मानसीचा चेहरा जास्तच पडणार? चेहरा आणखी मख्ख होऊ शकत नाही म्हणून विक्रम निराश होणार? खोळंबलेलं डिप्रेशन अखेर निर्मलाआत्यांना येणार? ही सुवर्णसंधी साधून त्यांचा वैभव मांगलेसारखा टकल्या नवरा त्यांना घटस्फोट देणार? मोनिकाचं शेवटचं एकदा कोर्टात जाणं राहूनच गेलंय. मग ती घटस्फोटित आहे की विवाहिता? बकुळा ऊर्फ ‘बक्स’ व विजयच्या दुकानातला नोकर यांचं ‘अफेअर’ सुरू होतं का? शंभरच्या वर एपिसोडसना मरण नाही. मग भलेही प्रेक्षक मरोत.

तुम्ही म्हणाल, (तुम्ही कशाला म्हणताय म्हणा!) मालिकेचे एवढे लचके तोडायचे होते तर शेवटपर्यंत ती बघितली कशाला? कशाला म्हणजे, नीट लचके तोडता यावेत यासाठी.
‘खुलता कळी खुलेना’ व ‘काहे दिया परदेस’ या डोकेदुखी मालिका संपल्याचा निःश्वास सोडावा तर या परवडल्या असं वाटायला लावणारी ‘जागो मोहन प्यारे’ नावाची दुर्गंधी टी.व्ही.मधून येऊ लागते. त्यातली भानू चुटकी वाजवून जादू करते. मग चुटकी वाजवून ती ही मालिकाच गायब का करीत नाही?

shireesh.kanekar@gmail.com