बीएसयूपीची घरे भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करा!

13

सामना प्रतिनिधी । ठाणे

बीएसयूपीची घरे भाडय़ाने देणाऱ्या अथवा विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. त्यामुळे घरे भाडय़ाने देणाऱ्यांचे धाबे दणाणले असून बीएसयूपी योजनेचा गैरफायदा कोणत्याही परिस्थिती खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

महानगरपालिकेने तुळशीधाम, सिद्धार्थनगर, खारटन, पडले गाव, ब्रह्मांड, कासारवडवली, टेकडी बंगला येथे ३ हजार ६०८ घरे बांधली आहेत. त्यापैकी ३ हजार ५४४ घरांचे वाटप करण्यात आले. रस्ता रुंदीकरणात तसेच अन्य विविध कामांमध्ये बाधित झालेल्यांना अत्यंत कमी भाडय़ाने पालिकेने बीएसयूपी योजनेत घरे दिली. मात्र काही लाभार्थ्यांनी ही घरे पालिकेची कोणतीही परवानगी न घेता परस्पर भाडय़ाने दिली आहेत, तर अनेकांनी त्याची विक्रीदेखील केल्याचे आढळून आले असून पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

२ हजार ७४० घरांची कामे ऑक्टोबरअखेर पूर्ण

बीएसयूपी योजनेंतर्गत २ हजार ७४० घरे बांधण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. हे काम ऑक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. दरम्यान, नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट आदी भागांमध्ये सुरू असलेली भुयारी गटारांची कामे पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या