पंतप्रधानांच्या मुंबई वारीसाठी मुख्यमंत्री शिंदे दावोस दौरा झटपट गुंडाळणार, फडणवीसांनी केला दौराच रद्द

महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक यावी, रोजगार निर्मिती व्हावी यासाठी दावोसमध्ये होणारी जागतिक आर्थिक परिषद ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या परिषदेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही जण जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला दावोस दौरा झटपट गुंडाळण्याचं ठरवलं आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौराच रद्द केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही 15 जानेवारीला दावोस दौऱ्यावर निघणार होते. इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या दौऱ्यावर जाणार आहेत मात्र ते 18 जानेवारी रोजी परत मुंबईला येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र 15 तारखेला दावोस दौऱ्यावर जाण्याचा निर्णयच रद्द केला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यादरम्यान काही मोठ्या प्रकल्पांचे भूमीपूजन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपने मिंधे गटासोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला मुंबई दौरा आहे. या दौऱ्या च्या निमित्ताने भाजप महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फोडणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यातून झालेल्या महत्त्वाकांक्षी विकासकामांचे भूमिपूजन-लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा घाट ‘मिंधे’ सरकारच्या दबावाखाली पालिका प्रशासनाने घातला आहे. 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईचा एकदिवसीय दौरा करणार असल्याचे समजते. यामुळे पालिका प्रशासनाची नियोजनासाठी प्रचंड धावपळ उडाल्याचे चित्र आहे.