मंत्रिपद हे अंतिम साध्य नव्हे तर साधन – क्षीरसागर

10

सामना प्रतिनिधी । चौसाळा

मंत्रिपदाची संधी ही अंतिम साध्य नव्हे तर साधन आहे असे प्रतिपादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे. तसेच शेवटच्या दोन महिन्यात मिळालेल्या या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्टा करत शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्यांसाठी मोठे काम करायचे आहे. ट्वेंटी-२० सामन्यातली ही शेवटचा ओव्हर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रन कसे काढता येतील, माणसं कसे जोडता येतील, समस्या कशा सोडवता येतील याकडे लक्ष देणार असल्याचेही क्षीरसागर यांनी म्हटले.

ते चौसाळा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेल्या गाळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचीन मुळुक, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, जगदीश काळे, अरुण डाके, विलास बडगे, गणपत डोईफोडे, अरुण बोंगाणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, वारी फिरल्यावर पाऊस येतो, असं म्हटलं जातं मात्र या वर्षी पाऊस अद्याप आला नाही. मी पंढरीला गेलो, वारीत पायी चाललो, पंगत दिली, विठ्ठलाला ‘पाऊस पडू दे’ म्हणून साकडं घातलं, हिंदुस्थानसह अन्य देशातील वेध शाळांनी २२ तारखेपासून मराठवाडा, विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज सांगितला आहे. त्यांचा अंदाज खरा ठरो, मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती सारखीच आहे. दुष्काळाने तुमचे-आमचे सालटे काढले आहे. दुष्काळ पाचवीला पुजला आहे. अशा स्थितीत आता मला सत्तेत संधी मिळाली, ही शेवटच्या काळातली संधी ट्वेंटी-२० मॅचमधला हा शेवटचा ओव्हर आहे. बघू किती रन काढता येतात ते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण शब्द दिला आहे. बीड जिल्हा आणि मराठवाड्यामधील समस्या सोडवण्याचे आणि माणसे जोडण्याचे महिनाभरात भरपूर काम केले आहे. माझा दावा नाही, सगळच काही बदलेल, परंतु नक्कीच शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी मोठे काम सुरू केले आहे. शेततळ्याला वाढीव पैसे मिळत आहेत. ठिबकाचे अनुदान वाढले आहे. या दोन महिन्यात जेवढं काम करता येईल तेवढं करायचं आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता कृत्रीम पावसासाठी संभाजीनगर, सोलापूर, शेगाव येथे स्टेशन केले असून २३ तारखेपासून कृत्रीम पाऊस पाडण्याची प्रक्रिया सुरू होईल. जेथे आभाळ असेल तेथे पाऊस पाडला जाईल, असेही क्षीरसागरांनी म्हटले.

क्षीरसागरांची अशीही वाढलेली क्रेझ
कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणे, संयम राखणे, कमी बोलणे, कामाला प्राधान्य देणे, कितीही त्रास झाला तरी शांत बसणे हा स्वभाव असणाऱ्या जयदत्त क्षीरसागरांच्या क्रेझमध्ये शिवसेनेचे मंत्री झाल्यापासून अधिक भर पडली आहे. ते जेथे जातील तेथे गर्दी होत आहे. लोक भेटण्यासाठी, बोलण्यासाठी अक्षरशः रीघ लावत आहेत.

जयदत्त क्षीरसागर शिवसेनेमध्ये आल्यापासून नव्या उत्साहात कामाला लागले आहेत. ना थकवा ना आळस. या त्यांच्या मूळ स्वभावासोबतच संयम, कामाला प्राधान्य, प्रत्येकाशी संवाद साधने यामुळे क्षीरसागर गावागावात लोकप्रिय आहेत. जिल्हाभरात त्यांची वेगळी क्रेझ आहे. यात ते शिवसेनेचे मंत्री झाल्यापासून त्याच्या क्रेझ मध्ये अधिक भर पडली आहे. ते जेथे, तेथे गर्दी, असे समीकरण झाले आहे. कामाची उरक असणारे क्षीरसागरांना नेहमीच जनतेमध्ये राहायला आवडते. लोकांची गर्दी त्यांना प्रेरणा देते. शिवबंधन बांधल्यापासून त्यांच्यातील कामाचा उत्साह वाढला आहे. लोकप्रियता ही वाढली आहे. त्यांना भेटण्यासाठी, बोलण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. जनतेतून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे मग शहरात असो की ग्रामीण भागात गर्दीचा गराडा वाढतच आहे.