
खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली. या आंदोलनात युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रकीण जाधव, श्रीकांत काडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, महेंद्र शिंदे आदी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मोहोळ – मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ मोहोळ शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर ‘जेल भरो’ आंदोलन केले. या आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष सुरेश शिवपुजे, शहराध्यक्ष किशोर पवार, सिद्राम पवार, बिलाल शेख, बिरा खरात, शैलेश सरवदे, राहुल कुडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
नगर – सुरत येथील जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. या निषेधार्थ खासदारकी रद्द करण्याच्या आदेशाच्या प्रती फाडून टाकत पायदळी तुडवून या घटनेचा निषेध काँग्रेसच्या चितळे रोड कार्यालयासमोर केला. आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी जोरदार निदर्शने काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, दशरथ शिंदे, संजय झिंजे, प्रवीण गीते, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, पुनम वंनम, शैलाताई लांडे, अलतमश जरीवाला, हाफिज सय्यद, आर. आर. पाटील आदींसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सांगली – राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द केल्यानंतर सांगलीत तीव्र प्रतिक्रिया उमटली. काँग्रेस भवनसमोर सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शैलजा पाटील, संजय मेंढे, करीम मिस्त्री, तौफिक शिकलगार, रवींद्र वळवडे, अभिजित भोसले आदि उपस्थित होते.