तंबाखूला नकार…

172

>>दिलीप जोशी<<

[email protected]

31 मे हा जागतिक तंबाखूविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. तंबाखूचं विविध प्रकारे सेवन हे घातक व्यसन आहे. हे माणसाला प्रकर्षाने जाणवलं ते विसाव्या शतकात. तोपर्यंत जगभरची लक्षावधी माणसं बिडी-काडी आणि तंबाखूच्या ‘गोळी’च्या आधीन झाली होती. तपकिरीच्या व्यसनाची चटक लागली होती. पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तरी आपल्याकडे बिडी आणि परदेशात सिगारेट ओढणाऱया स्त्रीयाही होत्याच. मिश्री किंवा मशेरी म्हणजे तंबाखू जाळून त्याची दात घासण्याची पावडर बनवली जायची. त्याचीही एक प्रकारची ‘नशा’ निर्माण व्हायची.

चहाची तलफ असणारे ठरावीक वेळेला चहा मिळाला नाही की जसे कासावीस होतात तीच गत तंबाखू बहाद्दरांची. नवतारुण्यात तर सिगारेट फुंकणे म्हणजे ‘मर्दानगी’ वगैरे वाटणारा भ्रम जोपासणारं वयच असतं. सिगारेटच्या धुरात आयुष्याचा धूर होतोय याची त्या बेफिकीर वयात कोण तमा बाळगतो!

तंबाखूचे दुष्परिणाम समजत नव्हते तोपर्यंत त्याचं कौतुकही होत होतं. पान-विडय़ात ‘पंचम’ म्हणून तंबाखूचा समावेश झाला की ते कडक ‘पान’ मानाचं ठरायचं. पुलंच्या ‘पानवाला’ या व्यक्तिचित्रात त्याचं वर्णन आलंय. शेवटी तर ‘कृष्ण चले वैकुंठ को, राधा पकडत बाय, यहा तमाकू खाय लो वहा तमाकू नाय’ असं साक्षात राधा श्रीकृष्णाला  सांगते असं रूपक आणि त्याचं मराठीकरण ‘कृष्ण चालले वैकुंठाला, राधा विनवी पकडून बाही, इथे तंबाखू खाऊन घे रे, तिथे कन्हैया तंबाखू ना।़ही’ असं करून ‘पानवाल्याची कहाणी संपते त्यातली गंमत, सूक्ष्म निरीक्षण आणि विनोद ते सारं पुनः पुन्हा ऐकावसं वाटतं पण ती काही पानपट्टीची किंवा तंबाखूची जाहिरात किंवा उदात्तीकरण नव्हे.

उलट, तंबाखूच्या कोणत्याही प्रकारच्या वापरातून खरोखरच ‘वैकुंठवासी’ होण्याचा काळ जवळ आणू नका अशी जाहिरात आता करावी लागते. तंबाखूमधील निकोटिन हे द्रव्य शरीराला किती घातक आहे याचा अंदाजच नव्हता त्या काळात. तंबाखूचं सेवन ‘तलफ’ आली की करण्यात संकोच वाटत नव्हता. चारजणांची मैफल जमली की चर्चा सोडून चुना-तंबाखू मळून त्याची देवाण-घेवाण व्हायची. तीच गोष्ट उच्चभ्रू समाजात कौतुकाने सिगारेट ‘ऑफर’ करण्याची. मग विशिष्ट स्मोकिंग शैलीत धुरांची वलयं सोडत त्याचा आस्वाद घेतला जायचा. तंबाखूप्रेमींमुळे निर्माण झालेल्या ‘थुंक’ संप्रदायाची दखल आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई सिनेमातील ‘छडी लागे छम छम’ या गाण्यातही घेतली गेलीय. त्यातल्या खाष्ट मास्तराच्या ‘तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण’ अशी स्थिती उद्भवायची. आता अनेक ठिकाणी सार्वजनिक भिंतीवरही तंबाखूविरोधी प्रचाराचा मजकूर दिसतो. बिडी-सिगारेटच्या ‘फुंक’ संप्रदायाचं पूर्वी सिनेमात कौतुक असायचं. आता केवळ सिगारेटच्या पाकिटावरच नव्हे तर सिनेमातील ‘स्मोकिंग’च्या दृश्यातही ‘सिगारेट पिणे आरोग्यास हानीकारक आहे’ असा उल्लेख करावाच लागतो.

या सगळ्य़ांमागचे भयावाह कारण म्हणजे तंबाखूने होणारा कॅन्सर नावाचा असाध्य रोग. केवळ तंबाखू सेवनाने कॅन्सर होतो असं नाही, पण तंबाखूमुळे त्याची शक्यता वाढते हे सिद्ध झालंय. दरवर्षी जगात तंबाखूच्या विविध प्रकारच्या सेवनाने ११ टक्के म्हणजे ७० लाख तर हिंदुस्थानात १० लाख लोकांचा मृत्यू ओढवतो. तंबाखूच्या व्यसनापायी अल्पायुषी ठरलेल्यांत राजकीय नेते किंवा अभिनेत्यांचाही समावेश आहे.

व्यसन, मग ते कोणतंही असो वाईटच. दारूच्या व्यसनाने यकृत विकृत होणं किंवा तंबाखूमुळे कॅन्सर होणं हे अकारण मृत्यूला आमंत्रण ठरू शकतं. हे सारं कळत असूनही ‘वळत’ नाही अशी जगाची स्थिती आहे. ही पिढय़ान्पिढय़ांची व्यसनं आणि त्या पदार्थाचा किफायतशीर व्यापार असं हे दुष्टचक्र आहे. कल्पक जाहिरातीतून तंबाखूविरोध प्रभावीपणे दाखवता येतो. सिगारेटच्या बाबतीत ‘टोबॅको सब्सिटय़ूट’ किंवा कमी तीक्रतेच्या सिगारेटीही आल्या. फिल्टर मोठं असणाऱया सिगारेटची निर्मिती आली. यासंदर्भात पूर्वी एका विदेशी वृत्तपत्रात पाहिलेली जाहिरात आठवते. एक उंच मनोरा दाखवून असं लिहिलं होतं की कडक सिगारेटऐवजी कमी तीक्रतेची सिगारेट ओढणं म्हणजे पन्नासाव्या मजल्यावरून उडी मारण्याऐवजी पस्तिसाव्या मजल्यावरून उडी मारण्यासारखं आहे! थोडक्यात काय परिणाम एकच.

आता जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने जगभर जनजागृतीचे कार्यक्रम होतात. अनेक संस्था तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी समुपदेशन करतात. तंबाखूची शिसारी येईल अशी ‘सिगारेट’ किंवा तत्सम उपाय असतात.

शेवटी हे सारं प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. मनाचा निग्रह केला तर कोणतंही व्यसन क्षणात सुटू शकतं. माझ्या वडिलांनी तपकिरीचं चाळीस वर्षांचं व्यसन एकेदिवशी निग्रहाने सोडल्याचं उदाहरण घरातच घडलंय. एकदा निर्धार केला की ‘तलफ’ येत नाही. व्यसनापेक्षा मनोबल तीक्र ठरलं की व्यसन सुटतंच. तंबाखू सेवन करणाऱयांनी स्वतःबरोबर कुटुंबीयांचाही विचार करून व्यसनापासून दूर रहायला हवं. आता तर ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चा इतरांना त्रास होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी सिगारेट बंदी असते. ती यशस्वी झाल्याचं दिसतं. केल्यानं होत आहे रे… हेच खरं!’

आपली प्रतिक्रिया द्या