‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला सुरुवातीलाच तंबाखूच्या पुड्यांचा खच

46

सामना प्रतिनिधी, मुंबई

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आजपासून तीन दिवस ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात मंत्रालयाच्या प्रांगणातून झाली, मात्र त्याच वेळेस मंत्रालयाच्या जनताजनार्दन गेटवर अडवण्यात आलेले अभ्यागत तंबाखूच्या पुड्या घेऊन प्रवेश देण्यासाठी पोलिसांशी भांडताना दिसत होते. कारण मंत्रालयात तंबाखू सोबत नेण्यावर पूर्वीपासूनच निर्बंध आहेत. त्यामुळे दररोज मंत्रालयाच्या गेटवर तंबाखूच्या पुड्यांचा खच पडलेला दिसतो.

सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या वतीने २९ ते ३१ मे या काळात ‘तंबाखूमुक्त महाराष्ट, आरोग्यसंपन्न महाराष्ट्र’ अभियान राबवण्यात येत आहे. त्याची सुरुवात मंत्रालयातून झाली पण तंबाखूमुक्त मंत्रालय करण्याचे मोठे आव्हान आहे. कारण राज्याच्या ग्रामीण भागातून मंत्रालयात दररोज येणारे अभ्यागत खिशातून तंबाखूच्या पुड्या घेऊन येतात.

मंत्रालयात पूर्वीपासून तंबाखूच्या पुड्या घेऊन येण्यावर बंदी आहे. जनताजनार्दन गेटवर तपासणीत प्रत्येकाचे खिसे तपासले जातात. खिशातून तंबाखूच्या पुड्या बाहेर काढून टाकण्यात येतात. दररोज तंबाखू, चुना, सिगारेट, मावा, गुटख्याची शेकडो पाकिटे पोलीस ताब्यात घेऊन मगच अभ्यागतांना आतमध्ये प्रवेश देतात. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीच्या दिवशी सहा ते सात हजार अभ्यागत मंत्रालयात येतात. तेव्हा तर जप्त केलेल्या तंबाखूच्या पुड्यांची संख्या तिपटीने वाढते. तंबाखूच्या पुड्या खिशातून काढल्यावर अभ्यागत व पोलिसांमध्ये वाद होतात. अनेकदा मंत्रालयातील कर्मचारीच खाली येऊन ‘आमच्या गावचा माणूस आहे, त्याला तंबाखूसह आतमध्ये सोडा’ अशी विनंती करतात असे पोलिसांनी सांगितले. तीन दिवस तंबाखूमुक्तीचे अभियान राबवून उपयोगाचे नाही. तंबाखूमुक्तीचा लढा वर्षभर देण्याची गरज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस व्यक्त करतात.

आपली प्रतिक्रिया द्या