धक्कादायक सर्वेक्षण, नगरमधील 204 शाळा तंबाखू- सिगारेटच्या विळख्यात

सामना ऑनलाईन । नगर

शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे म्हणून तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. तशा सूचनाही शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र, अहमदनगर शहरातील 204 शैक्षणिक संस्थांनी तंबाखू विरोधी कोटपा कायद्याची आपल्या शाळेत पूर्णपणे अंमलबजावणी केली नसल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. परिणामी व्यसनमुक्त शालेय परिसरापासून हजारो विद्यार्थी वंचित असून नगरमधील या शाळा तंबाखू-सिगारेट विक्रीच्या विळख्यात असल्याचे चित्र आहे.

स्नेहालय आणि संबंध हेल्थ फाऊंडेशन तर्फे नगर शहरातील माळीवाडा, सावेडी, तारकपूर, केडगाव, बोहल्ये गाव, मुकुंदनगर, बुऱ्हाण नगर, दरेवाडी, वाकोडी, कॅम्प एरिया, श्रीराम नगर अशा सर्वच विभागातील सरकारी, पालिका आणि खाजगी अशा 204 शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सर्वेक्षण करण्यात आले.

मुलांना तंबाखू सिगारेट्स विकल्यास 7 वर्ष सश्रम कारावास
सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा 2003 नुसार कलम- 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- 6 (ब) नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे गुन्हा आहे. कलम- 6 नुसार बालकांना किंवा बालकांकडून तंबाखू सिगारेट्स विक्री करणे गुन्हा आहे. तसे आढळल्यास बाल न्याय कायदा 2015 कलम- 77 नुसार सात वर्ष सश्रम कारावास आणि एक लाखापर्यंतचा दंड अशी शिक्षा आहे.