आजचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार; आदित्य ठाकरे यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

आजचा अर्थसंकल्प म्हणजे ज्या राज्यात ओढाताण करून घटनाबाह्य सरकार आणलं, इथले उद्योग बाहेर नेले अशा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आज संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून मुंबईकर आणि महाराष्ट्राची घोर निराशा झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राला, मुंबईला, सामान्य माणसाला या अर्थसंकल्पातून नक्की काय मिळालं हा एक मोठा सवाल येतोच, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

ज्या राज्यात आताच निवडणुका होऊन गेल्या आहेत, मोठ्या संख्येने जागा जिथे जिंकल्या आहेत, तिथे महाराष्ट्रातून जिथे वेदांता फॉक्सकॉन, एअरबस, गिफ्टसिटी, फायनान्शिअल सेंटर गेलं आहे त्यांना अधिकच्या सवलती मिळाल्या आहेत. सुरतला डायमंड हबही मिळाल्याचं कळतं आहे. पण महाराष्ट्रातून जिथे जिथे उद्योग नेलेत, महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम झालं आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

कर्नाटकात निवडणुका येऊ घातल्या आहेत. तिथे त्यांना एक्झिट पोलमध्ये फारशा जागा दिसत नसल्याने तिथे खर्च दाखवला आहे. पण महाराष्ट्राचा उल्लेख राष्ट्रीय बजेटमध्ये कुठे आलेला नाही, मुंबईचा नाही. मूळ मुद्दा हाच राहतो की आताजरी इथे सरकार घटनाबाह्य जरी असेल, एवढी सारी ओढाताण करून सरकार बनवलं असेल तरी देखील महाराष्ट्राला मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं आणि काहीच द्यायचं नाही, हेच आजच्या बजेटमधून दिसत आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी संपात व्यक्त केला.

बाकीच्या दाव्यामध्ये मी बोलणार नाही. पण महिलांसाठी काही विशेष दिलं आहे का? तर तसं काही दिसत नाही. तरुणांनासाठी काही होतं का? काही जुन्याच घोषणा आहेत. कर्नाटकासाठी अपर भद्रा क्षेत्रात करायचं वर्षानूवर्ष तिथे भाजपचं सरकार आहे तरी देखील आताच त्यांना देण्याची गरज का पडली?, असा सवाल त्यांनी केला.

एका बाजूला आभार मानणं आणि दुसऱ्या बाजूला निवडणुका येताहेत म्हणून तिथे देणं. दुसऱ्या कुठल्याही राज्याचा उल्लेख नाही. महाराष्ट्रात ओढाताण करून घटनाबाह्य सरकार बनवलं तिथे आपल्याला काहीच मिळालेलं नाही, अशी खणखणीत प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.