आजची शिक्षणव्यवस्था – काही समस्या, अस्वस्थ करणाऱया

3008

<< दृष्टीकोन >>    << पद्मश्री डॉ. यू. म. पठाण >>

आजच्या शिक्षण पद्धतीतले नेमके दोष कोणते, याविषयी फार कमी विचार केला जातो. याबाबत योग्य विचारमंथन होऊन अपेक्षित उद्दिष्टांची पूर्तता होणं गरजेचं आहे. या समस्यांचा आणि त्यावरील उपायांचा घेतलेला वेध.

क्षण क्षेत्राविषयी आपल्याकडे भरभरून बोललं जातं, आजच्या शिक्षण पद्धतीतले नेमके दोष कोणते, याविषयी फार कमी जण बोलतात किंवा फार थोडय़ा लोकांनी सूक्ष्म विचार केलेला असतो. त्यातील विधायक सूचनांचा शासनानं, विविध शैक्षणिक मंडळांनी व विद्यापीठांनी विचार करून त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही होणे गरजेचं असतं. शैक्षणिक परिवर्तनासाठी याबाबत काही प्रयोग करून त्यांची फलश्रुती आजमावणंही आवश्यक असतं. ज्या प्रयोगांची फलश्रुती अपेक्षापूर्ती करणारी असते किंवा करण्याची शक्यता असते, त्यानुसार अभ्यासक्रमात व शिक्षणव्यवस्थेत परिवर्तन करणं गरजेचं असतं. या परिवर्तनाचा अनेक पिढय़ांच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याविषयी फार दक्षता बाळगणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणं त्यांचं कालनिबद्ध नियोजन करणंदेखील अनिवार्य असतं.

गेली चार-साडेचार दशके या क्षेsत्रात काम करताना,  शिक्षण पद्धतीतील त्रुटी कशा नाहीशा कराव्यात व या शिक्षण पद्धतीत कालमानानुरूप कसं परितर्वन करावं, त्यासाठी कोणते उपक्रम हाती घ्यावेत, याचा थोडाफार अनुभव मला आहे. शिक्षणव्यवस्थेच्या भवितव्याविषयी कळकळ नि आस्था जपत या क्षेत्रातील विधायक मार्ग कसे निवडता येतील हेच या लेखाचे प्रयोजन. भाषा विज्ञान हा माझा विशेष संशोधनाचा विषय. ‘प्राग स्कूल ऑफ लिंग्विस्टिक्स’ ही या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त संस्था. या संस्थेला भेट देऊन तिथल्या अभ्यासक्रमांची मी माहिती घेतली. त्या संस्थेनंही कालबाहय़ अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प थांबवून आधुनिक (वर्णनात्मक) भाषा विज्ञानाचे अभ्यासक्रम व संशोधन प्रकल्प स्वीकारले होते.

आपल्याकडे पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी विषयाचा समावेश करण्यात आला. ही बाब बदलत्या काळानुसार आवश्यक होती, हे खरं असलं तरी ज्या पद्धतीनं हा प्रयोग करण्यात आला, ती किती सदोष होती, हे यासंदर्भात मराठवाडय़ात झालेल्या सर्वेक्षणावरून सहज लक्षात येतं. अनेक शाळांत ही योजना नीटशी राबवली गेली नाही. शिक्षकांच्या प्रशिक्षणालाही पुरेसा वेळ मिळाला नाही. अनेक ठिकाणी कार्यशाळांसाठी, शिबिरांसाठी योग्य प्रशिक्षक वा ‘रिसोर्स पर्सन्स’ मिळाले नाहीत. योजना अभ्यासक्रमात समाविष्ट होऊनही ती पुरेसं समाधान देऊ शकली नाही, ही कारणं आहेतच. ‘बालभारती’च्या सुरुवातीच्या काळात (१९६८ पासून) जवळपास दोन दशकं मी मराठी समितीचा काही काळ सदस्य व काही काळ अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यावेळी अभ्यासक्रम, पाठय़पुस्तकं बदलायचं ठरविलं की, लगेच पुढच्या वर्षांपासून ती योजना राबविण्यात येत नसे. याकरता विविधि पातळ्यांवर निरीक्षण व अभ्यास केला जात असे. शिक्षकांसाठी शिबिरं, कार्यशाळा आयोजित केल्या जात. विविध स्तरावर त्याचा अभ्यास केला जात असे. त्यामुळे पुरेसा कालावधी न मिळाल्याने होणारी गोंधळाची स्थितीही उद्भवत नसे. आता मात्र तसे होत नाही.

विविध इयत्तांतील विविध विषयांत श्रेणीबद्ध अभ्यासक्रम योग्य प्रकारे राबविला जातो आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी वा त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विषय समित्यांचं अस्तित्व व त्यांचं सातत्य आवश्यक असतं. या समित्या नसल्यावर ‘निर्णायकी’ची स्थिती निर्माण होऊ शकते व तिचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हेही इथं लक्षात घ्यायला हवं. काही वेळा अचानक वा पुरेसा अवधी न देता झालेले अभ्यासक्रमातील बदल विद्यार्थी व शिक्षक तसेच पालक यांच्या मनात गोंधळ उडवून देतात.

प्रत्येक शाखेच्या सीईटीच्या परीक्षांमुळे अडथळय़ांची शर्यत निर्माण होत आहे. सीईटीचं महत्त्वही अमान्य करता येत नाही, पण त्यामुळं मूळ परीक्षेचं महत्त्व कितपत राहतं, याविषयी मनात शंका निर्माण होते. या दोन्ही परीक्षांमुळं विद्यार्थ्यांच्या मनावर जो ताण पडतो, तो वेगळाच. माध्यमिक शाळांच्या अध्यापकांसाठी बी.एड.चा अभ्यासक्रम आहे. पण उच्च माध्यमिकसाठी सध्या तसा अभ्यासक्रम नाही. उच्च माध्यमिक अध्यापकांसाठीही बी.एड.ची अर्हता गृहीत धरली जाते. या अध्यापकांनी अकरावी-बारावीचे प्रॅक्टिसिंग लेसन्स घेतलेले नसतात. त्यांनी बी.एड.च्या अभ्यासक्रमाच्या वेळी केवळ माध्यमिकचेच पाठ घेतलेले असतात. हा ‘लॅक्युना’ लक्षात घेऊन त्यांच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आखण्याची खरं तर गरज आहे.

विद्यापीठ स्तरावरील विविध समस्यांचा, अभ्यासक्रमांचा विचार व नियोजन करण्यासाठी विद्वत्सभा असते.  या सभेला व्यापक अधिकार असतात. शिवाय विद्यापीठाच्या विविध विषयांची अभ्यास मंडळंही असतात. त्यांनी काळजी घेतल्यास या स्तरावरील अनेक शैक्षणिक समस्यांची उकल होऊ शकते. उदा. एम.फिल.च्या  अभ्यासक्रमात संशोधन-पद्धती व अध्यापन पद्धती हे दोन्ही विषय असतात. पण प्रत्यक्ष अध्यापन पद्धतीचा प्रयोग कितीशा विद्यापीठांनी केला? या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात अध्यापन करताना निश्चितच उपयोग झाला असता.

‘नेट-सेट’चा प्रयोग हाही विद्यापीठ स्तरावरील एक चक्रव्यूहच आहे काय, असं वाटल्यावाचून राहात नाही. इथंही अडथळय़ांची शर्यत सुरू होते. काही विषयांचे निकाल (काही विद्यापीठांचे) दोन – अडीच टक्क्यांपासून कधी कधी शून्याचा पारा गाठतात, तेव्हा फार दुःख वाटतं. पदव्युत्तर परीक्षेत प्रथम/द्वितीय श्रेणींचे गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची अवस्था अशी का व्हावी? की ती अर्हता नेट/सेटच्या कामाची नाही? मग त्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा स्तर तरी नेट-सेटच्या पातळीपर्यंत उंचवायला हवा, त्यासाठी विद्यापीठं काय करतात? काही विद्यापीठांनी ‘नेट-सेट’साठी वर्ग चालविले आहेत, पण त्यांचा कितीसा उपयोग झाला, याविषयी आत्मपरीक्षण करायला हवं.

आजच्या शिक्षण पद्धतीतील काही समस्यांविषयी या लेखात तुमच्याशी हितगुज करता आलं नि मुक्त चिंतन  करता आलं, याचं थोडंफार समाधान मला निश्चित वाटतं.

 

आपली प्रतिक्रिया द्या