मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब

26

सामना ऑनलाईन, इंदूर

पहिल्या पराभवानंतर पुढचे सलग चार आयपीएल सामने जिंकणारा माजी विजेता मुंबई इंडियन्स संघ उद्या इंदूरच्या ऐतिहासिक होळकर मैदानावर अपयशातून बाहेर येण्यासाठी धडपडणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबशी झुंजणार आहे. आपली विजयी दौड कायम राखत गुणतालिकेत टॉपवर जाण्याच्या निर्धाराने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ मैदानात उतरणार आहे. पाच लढतींतून केवळ दोनच सामने जिंकणाऱ्या पंजाबची दहाव्या आयपीएलमधील वाटचाल मात्र बिकटच वाटत आहे.

पहिल्या पराभवाची ठेच लागल्यानंतर मुंबईचे ‘स्टार’ खेळाडू दुसऱ्या लढतीपासून मात्र आपला नैसर्गिक खेळ दाखवू लागले आहेत. कायरॉन पोलार्ड, युवा फलंदाज नितीश राणा, हार्दीक व कृणाल पांडय़ा हे बंधू आणि स्वतः कर्णधार रोहित शर्मालाही फलंदाजीत सूर सापडला आहे. त्यामुळे सलामीची चिंता वगळता मुंबईची फलंदाजी तशी भक्कमच वाटत आहे. मुंबईचा नीतिश राणा व पंजाबचा मनन व्होरा या नवोदितांवर क्रिकेटशौकिनांची विशेष नजर असेल.

पंजाबला गरज सांघिक खेळाची
ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाने यंदाच्या आयपीएलची सुरुवात दोन विजयाने केली. पण नंतरच्या तीन लढतींत त्यांना पराभव पत्करावा लागला. सांघिक खेळ करण्यात पंजाबला अपयश आल्याने पुढच्या लढतींत त्यांना विजयासाठी जोरदार संघर्ष करावा लागणार आहे.

मुंबईकर गोलदाजही फॉर्मात
मुंबईच्या लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेनाघन, जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांसोबत अनुभवी ऑफस्पीनर हरभजनसिंगही फॉर्मात आहे. शिवाय ‘युवा’ गोलंदाज कृणाल पांड्याही मैदानात आपली करामत दाखवू लागला आहे. त्यामुळे उद्या इंदूरमध्ये मुंबईचेच पारडे पंजाबपेक्षा जड ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या