शौचालयातच थाटले स्वयंपाकघर…कारण वाचून व्हाल थक्क …

1068

गरीबीमुळे आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेकजण खुराड्यासारख्या लहान घरात राहतात. काहीजणांच्या घरात नीट बसायलाही जागा नसते. तर अनेक गावांत वीज नसल्याने छोट्याश्या घरात मुले दिव्याच्या उजेडातच अभ्यास करतात. मात्र, काही संकटे अशी येतात, की माणूस हतबल होतो. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये एका कुटंबाने चक्क शौचालयातच स्वयंपाकघर थाटले आहे. या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

बाराबंकीजवळील अकनपूर गावात राम प्रकाश यांना ‘स्वच्छ भारत’ योजनेतंर्गत सरकारकडून शौचालय बांधून मिळाले. मात्र, पावसाळ्यात ते राहत असलेल्या झोपडीची दूरवस्था झाली. त्यातच गरीबी आणि हलाखीची परिस्थिती पाठ सोडत नव्हती. त्यामुळे झोपडीची डागडूजी करणेही त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना शौचालयातच स्वयंपाकघर हलवावे लागले. आमच्याकडे राहण्यायोग्य जागा नव्हती. पावसाळ्यात झोपडीत जेवण बनवणे आणि उभे राहणेशी शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात सिमेंट आणि वीटांपासून बनलेल्या या शौचालयाचा आश्रय आम्हाला घ्यावा लागला. पावसाळा वाढल्यावर झोपडीची आणखी दूरवस्था झाली. त्यामुळे नाईलाजाने आम्ही या शौचालयातच जेवण बनवू लागलो, असे राम प्रकाश यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून आम्ही या शौचालयाचा स्वयंपाकघर म्हणून वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राम प्रकाश यांच्या झोपडीबाहेरील शौचालयातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. त्यामुळे दुर्घटना झाल्याच्या शक्यतेने त्यांनी प्रशासनाला याबाबत कळवले. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या चौकशीत राम प्रकास यांच्या कुटुंबियांनी शौचालयातच स्वंयपाकघर बनवल्याची ही बाब समोर आली. त्यानंतर याबाबतचे वृत्त सर्वत्र पसरल्याने प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आणि प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. प्रधानमंत्री आवास योजनेत नावे असलेल्या पात्र लाभार्थिंना या योजनेतून घरे देण्यात येतील. ज्यांची नावे या यादीत नसतील आणि घरांसाठी जे पात्र असतील त्यांना मुख्यमंत्री आवास योजनेतून घरे देण्यात येतील असे बाराबंकीचे जिल्हाधिकारी डॉक्टर आदर्श सिंह यांनी सांगितले. घर मिळेल, तेव्हा मिळेल. मात्र, स्वयंपाकघरासाठी योग्य जागा द्यावी, अशी अपेक्षा राम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या