भंगार बसेसचे प्रसाधनगृह : ठाण्यात साकारणार ‘टॉयलेट फॉर हर’ 

33

सामना प्रतिनिधी । ठाणे

प्रसाधनगृहांच्या कमतरतेअभावी कुचंबणा होणाऱ्या महिलांना ठाणे महापालिकेने मोठा दिलासा दिला आहे. ठाणे परिवहनच्या भंगार झालेल्या बसेसची डागडुजी करून त्यात खास महिलांसाठी प्रसाधनगृह  तयार केले जाणार आहे. ही प्रसाधनगृहे शहरातील विविध भागांत ठेवण्यात येणार असून ‘टॉयलेट फॉर हर’ या नावाने ती लवकरच सुरू होणार आहे.

प्रसाधनगृहे नसल्याने मुंबई, ठाण्यात महिला संघटनांनी ‘राइट टू पी’ आंदोलन छेडले होते. याची गंभीर दखल पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली. ठाणे महापालिकेच्या अधिकारी परिषदेत दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘टॉयलेट फॉर हर’ ही योजना तत्काळ लागू करण्याचा निर्णय घेतला.

ठाणे परिवहन सेवेकडे सद्यस्थितीत अनेक बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत. या भंगार बसेस टॉयलेट फॉर हर महिला प्रसाधनगृहांसाठी  वापरण्यात येणार आहेत. जाहिरातीच्या अधिकाराच्या मोबदल्यात या भंगार बसेसचे प्रसाधनगृहात रूपांतरित करून त्या शहराच्या विविध भागांत ठेवण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या. तसेच या बसेसमधील प्रसाधनगृहांची निगा, देखभाल व स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थित होता.

मोटरसायकल अॅम्ब्युलन्सही सुरू होणार
अपघात किंवा आग दुर्घटनेतील जखमींना तत्काळ वैद्यकीय सेवासुविधा मिळावी यासाठी प्राथमिक उपचार सुविधेसह दुचाकी आपत्कालीन रुग्णवाहिका (मोटरसायकल ऍम्ब्युलन्स) सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. जवळपास ३० मोटरसायकलच्या माध्यमातून आपत्कालीन रुग्णवाहिका सुरू करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी तत्काळ सादर करावा, अशा सूचना जयस्वाल यांनी यावेळी दिल्या. या मोटरसायकल अॅम्ब्युलन्समुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या