App कर्ज देणार, मात्र त्याआधी तोंड पाहणार आणि आवाज ऐकणार

Female Head with biometric facial map

अॅपद्वारे कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवरून सध्या देशात बराच गदारोळ सुरू आहे.  मात्र तिकडे जपानमधील टोकियोमध्ये एक नवं अॅप कर्ज देण्यासाठी विकसित करण्यात आलं आहे.  या अॅपची खासियत ही आहे की तुमचा चेहरा पाहून आणि आवाज ऐकून तुम्हाला कर्ज देण्याचा निर्णय घेणार आहे. अॅपच्या चाचणीत पास झाल्यास दोन मिनिटांत लोन मिळणं शक्य होणार आहे.  हे अॅप लोन घेणाऱ्याची परतफेड करण्याची मानसिकता जोखते आणि त्याबाबत कर्जपुरवठा करणाऱ्या कंपनीला त्याचा अहवाल देते. हा अहवाल पाहून मगच कंपनी कर्जाबाबतचा निर्णय घेते.

असं म्हणतात की ‘फर्स्ट इंमप्रेशन इज लास्ट इंम्प्रेशन’.  पहिल्या भेटीत व्यक्तीबाबत आपण जे मत बनवतो ते बदलण्यासाठी बराच अवधी जावा लागतो. या मानवी स्वभावामुळे कर्ज घेऊन ते बुडवण्याची मानसिकता असलेली व्यक्ती भोळाभाबडा चेहरा करून कर्ज मिळवू शकते.  मात्र या अॅपला कोणीही व्यक्ती फसवू शकत नाही असं हे अॅप विकसित करणाऱ्या कंपनीचं म्हणणं आहे.  Facial and Voice recognition असे या अॅपचे नाव आहे. याचा फायदा कर्जपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे.

कर्ज घेणं ही फार किचकट गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळी माहिती द्यावी लागते, कागदपत्र सादर करावी लागतात ज्याच्या छाननीसाठीही बराच वेळ जातो.  अनेक टप्प्यातून पार झाल्यानंतर आपल्याला कर्ज मिळते. ही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया हद्दपार करण्यासाठी हे अॅप मदत करणारं ठरू शकेल. या अॅपमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंसच्या मदतीने आवाज आणि चेहरा याचा अभ्यास केला जातो. या अभ्यासाच्या आधारे अॅप त्या व्यक्तीला काही गुण देते, गुण जितके जास्त तितकी कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असा साधार अर्थ आहे.

Deepscore AI या कंपनीने हे अॅप तयार केले असून त्यांनी दावा केला आहे की या तंत्रामुळे खोटं बोलणाऱ्या 70टक्के लोकांना आपण पकडू शकतो.  अॅपने दिलेल्या गुणांच्या आधारे वित्त कंपन्या सतर्क राहून कर्ज देण्याबाबतचा विचार करतील असं या कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांच्या चेहऱ्यावर नजर ठेवली जाते, त्यांचा आवज ऐकला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलत असते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थोडा तणाव जाणवतो. त्याचा चेहरा, डोळे हलायला लागतात आणि त्यांचा परिणाम त्यांच्या आवाजावरही होतो. यावरून खोटं बोलणारी व्यक्ती पकडता येऊ शकते. मात्र या तंत्रज्ञानावर काहींनी शंकाही उपस्थित केली आहे. काही लोकांना नाक धरण्याची, डोळे उघडझाप करण्याची सवय असते यावरून हे अॅप ती व्यक्ती खोटं बोलत असल्याचा निष्कर्ष काढू शकते असा आरोप या अॅपवर आक्षेप घेणाऱ्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या