हिंदुस्थानी महिलांचे पाऊल पडते पुढे, मेरी, सिंधू, मनिकाचे दमदार विजय

हिंदुस्थानी महिला खेळाडूंची ‘पॉवर’ रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसून आली. दिग्गज बॉक्सर मेरी कोम, रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि टेबल टेनिस या खेळातील आशा मनिका बत्रा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर लीलया विजय मिळवून पुढे पाऊल टाकले.

सहज हरवले

सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मेरी कोम हिने 51 किलो वजनी गटात मिग्वेलीना हर्नांडेझ हिला 4-1 अशा फरकाने सहज हरवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मेरी कोम यावेळी म्हणाली, ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलेय. सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालीय. सर्व स्पर्धांमध्ये मला पदक जिंकता आले आहे. आता फक्त ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा ध्यास लागून राहिलाय. यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतेय, असे तिने पुढे नमूद केले.

व्यावसायिक खेळाचा नजराणा

2019 सालामध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या पी व्ही सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमधील बॅडमिंटन या खेळातील महिला गटाच्या सलामीच्या लढतीत व्यावसायिक खेळाचा नजराणा दाखवला. तिने इस्रायलच्या सेनीना पोलीकारपोवा या खेळाडूला 21-7, 21-10 अशा फरकाने पराभूत केले आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला. पी व्ही सिंधू यावेळी म्हणाली, सलामीच्या लढतीत तुलनेने सोपे आव्हान होते. पण मी प्रत्येक गुण कमवण्यासाठी मेहनत घेतली. प्रतिस्पर्ध्याला कमकुवत समजले नाही. कोर्टवरील खेळाचा सरावही करून घेतला. याचा फायदा मला पुढील फेऱ्यांमध्ये होईल, असे पी व्ही सिंधूने आवर्जून सांगितले.

सनसनाटी विजय

62 व्या रँकिंगवरील मनिका बत्रा हिने रविवारी 32 व्या रँकिंगवरील मार्गरीता पेसोत्स्का हिच्यावर सनसनाटी विजय मिळवला. मनिका बत्रा हिने प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान 4-11, 4-11, 11-7, 12-10, 8-11, 11-5, 11-7 अशा फरकाने परतवून लावले. मनिका बत्रा हिने 57 मिनिटांमध्ये रोमहर्षक विजयाला गवसणी घातली आणि घोडदौड केली.

आपली प्रतिक्रिया द्या