टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकूनच महाराष्ट्राचे खेळाडू मायदेशी परततील, अजित पवारांचा विश्वास

ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी राज्याच्या शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती रुजवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज केले. टोकियो ऑलिम्पिकपिकमध्ये प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्रातील खेळाडू देशासाठी पदक जिंकून परत येतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक संघाला यशासाठी शुभेच्छा दिल्या.

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे डेक्कन जिमखाना-पुणे येथे ‘ऑलिम्पिक डे 2021’ कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार हे कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.

क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव बाळासाहेब लांडगे, पदाधिकारी प्रकाश तुळपुळे, नामदेव शिरगावकर, सुंदर अय्यर, धनंजय भोसले, दयानंद कुमार आदींसह ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेले तसेच उदयोन्मुख खेळाडू, क्रीडा कार्यकर्ते, क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या राही सरनोबत (नेमबाजी), तेजस्विनी सावंत (नेमबाजी), प्रविण जाधव (तिरंदाजी), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), स्वरुप उन्हाळकर (पॅरा शुटींग), सुयश जाधव (पॅरा जलतरण) यांच्यासह माजी ऑलिम्पिक खेळाडूंचाही यावेळी ऑनलाईन सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी यांनी आज जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करत असताना, 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आठवण होते. पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राच्या सुपुत्राने मिळवून दिले होते. येत्या जुलै महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातून सात खेळाडू सहभागी होत आहेत. राज्य सरकार पूर्ण ताकदीने खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. महाराष्ट्राचे खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करुन देशासाठी पदक जिंकतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या जिद्दीने जात असताना, खेळाडूंनी, प्रशिक्षक, मॅनेजर, संपूर्ण टीमने कोरोनापासून बचावाची काळजी घ्यावी. जपानमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी असले तरी अनेक देशातून तिथे खेळाडू येणार आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी, सपोर्ट टीम सदस्यांनी आपली व सहकाऱ्यांची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी संघासाठी चीनी प्रायोजक कंपन्यांना टाळावे, या देशवासियांच्या भावनेचा आदर करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जागतिक ऑलिम्पिक संघटना असो की महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवण्याचा, सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्यातील, देशातील क्रीडासंघटना व क्रीडा कार्यकर्ते करत असतात. राज्यातील क्रीडा कार्यकर्त्यांच्या क्रीडासेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने राज्यातील खेळाडू, क्रीडा कार्यकर्ते, क्रीडा रसिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या