‘गोल्डन स्लॅम’च्या जोकोवीचच्या आशांना सुरुंग, उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे संधी हुकली

06

जगातील सर्वोत्कृष्ट टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचच्या ‘गोल्डन स्लॅम’ जिंकण्याच्या आशांना शुक्रवारी जर्मनीच्या अॅलेक्झॅण्डर ज्वेरेवने सुरुंग लावला आहे. टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमधील टेनिस या खेळातील पुरुषांच्या एकेरीतील उपांत्य फेरीच्या सामन्यात अॅलेक्झॅण्डर ज्वेरेवने नोव्हाक जोकोवीचचा पराभव करत धक्कादायक निकाल नोंदवला.

टेनिस जगतामध्ये ‘गोल्डन स्लॅम’ पटकावण्याचा विक्रम 1988 साली स्टेफी ग्राफने केला होता. ‘गोल्डन स्लॅम’चा मान मिळवणारी स्टेफी ग्राफ ही जगातील एकमेव टेनिसपटू आहे. यंदाच्या वर्षात सुसाट सुटलेल्या नोव्हाक जोकोवीचने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डनचा किताब आपल्या नावावर केला.

टोकियो ऑलिम्पिकमधील सहभाग निश्चित झाल्यानंतर नोव्हाक जोकोवीच सुवर्ण पदकाला गवसणी घालेल असे सर्वांना वाटत होते. तसेच ऑलिम्पिकनंतर होणाऱ्या यू.एस. ओपनचा किताब आपल्या नावावर केल्यास नोव्हाक जोकोवीच हा ‘गोल्डन स्लॅम’ पटकावणारा जगातील पहिला पुरुष टेनिसपटू ठरला असता.

मात्र आज (दि. 30) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अॅलेक्झॅण्डर ज्वेरेवने नोव्हाक जोकोवीचचे स्वप्न भंग केले. नोव्हाक जोकोवीच आणि अॅलेक्झॅण्डर ज्वेरेव यांच्यात झालेल्या सामन्यात 1-6, 6-3, 6-1च्या फरकाने अॅलेक्झॅण्डर ज्वेरेवने नोव्हाक जोकोवीचला नमवत त्याच्या ‘गोल्डन स्लॅम’वर पाणी फेरले. तरीही आगामी काळात होणाऱ्या यू.एस. ओपनचा किताब आपल्या नावावर करण्याची संधी नोव्हाक जोकोवीचकडे असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या