शटलक्वीन सिंधूची उपांत्य फेरीत धडक, एका विजयानंतर पदक पक्के होणार

हिंदुस्थानची शटलक्वीन पी.व्ही. सिंधू इतिहास रचण्याच्या उंबरठय़ावर उभी आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारी पी.व्ही. सिंधू हिने शुक्रवारी जपानच्या अकाने यामागुची हिला 21-13, 22-20 अशा सरळ दोन गेममध्ये पराभूत करीत टोकियो ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनच्या महिला एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानी कन्येसमोर अंतिम चारच्या लढतीत चीन तैपईच्या तेई झू यींग हिचे आव्हान असणार आहे. उपांत्य फेरीत विजय मिळवल्यास पी.व्ही. सिंधू दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी हिंदुस्थानची पहिली महिला खेळाडू ठरेल.

पहिला गेम सहज जिंकला

पी.व्ही. सिंधूने अकाने यामागुचीविरुद्धच्या लढतीत पहिला गेम सहज जिंकला. ब्रेकच्या दरम्यान हिंदुस्थानची दिग्गज खेळाडू 11-7 अशा फरकाने पुढे होती. त्यानंतर 13-8 अशा फरकाने आघाडी कायम ठेवत पुढे जाऊन 21-13 अशा फरकाने गेम जिंकण्यात पी.व्ही. सिंधूने बाजी मारली.

दुसऱ्या गेममध्ये कडवा संघर्ष

दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. ब्रेकमध्ये पी.व्ही सिंधूकडे 11-6 अशा फरकाने आघाडी होती. पण अकाने यामागुची हिने त्यानंतरच्या 12 गुणांपैकी 10 गुण जिंकत झोकात पुनरागमन केले. पण दबावाखाली पी.व्ही. सिंधूने आपला खेळ ढासळू दिला नाही. तिने 22-20 अशा फरकाने हा गेम जिंकत लढतही आपल्या नावावर केली.

अजून मिशन बाकी

पी.व्ही. सिंधू हिने उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर आनंद व्यक्त केला. पण माझे मिशन अजून पूर्ण झालेले नाही, असेही तिने आवर्जून नमूद केले. याप्रसंगी ती म्हणाली, अकाने यामागुची हिच्यावर मिळवलेल्या विजयाचा आनंद आहे. पण अजून स्पर्धा बाकी आहे. आता थोडं रिलॅक्स होईन. त्यानंतर पुढील लढतीची तयारी करीन.

उपांत्य फेरीच्या लढती खालीलप्रमाणे

चेन यू फेई – ही बिंग जिओ

पी.व्ही. सिंधू – तेई झू यींग

(टीप – दोन्ही लढती शनिवारी होतील)

आपली प्रतिक्रिया द्या