Tokyo Olympic हॉकी सामन्यात हिंदुस्थानचा दणदणीत विजय, स्पेनला 3-0 ने हरवले

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धेत हिंदुस्तानच्या (India) हॉकी (Hockey) संघाने मंगळवारी कमाल केली. हिंदुस्थानी संघाने स्पेनच्या (Spain) संघाला 3-0ने पराभूत केलं. या दणदणीत विजयामुळे हिंदुस्थानी संघ अ गटात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हिंदुस्थानकडून रुपिंदर पाल सिंगने 2 गोल केले तर सिमरनजीतने एक गोल वसूल केला. रुपिंदर पाल सिंगने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 3 गोल पूर्ण केले आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून हिंदुस्थान स्वीकारावा लागला होता लाजिरवाणा पराभव

जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ऑलम्पिक 2020 मध्ये रविवारी झालेल्या लढतीत हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने फर्स्ट क्वार्टरपासून वर्चस्व गाजवत हा सामना 7-1 असा जिंकला होता. ग्रुप स्टेजमधील पहिल्या लढतीत हिंदुस्थानच्या संघाने न्यूझीलंडवर 3-2 असा विजय मिळवला होता. त्यामुळे हिंदुस्थानी हॉकी संघाचे मनोबल उंचावले होते. मात्र रविवारी झालेल्या लढतीत बचाव फळीने खराब खेळ केल्याने आणि मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रुपांतर होऊ न शकल्याने हिंदुस्थानच्या संघाला पराभव पाहावा लागला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या मिनिटापासून हिंदुस्थानच्या संघावर दबाव टाकला आणि दहाव्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली. यानंतर सेकंड हाफमध्ये पाच मिनिटात तीन गोल करत 4-0 अशी आघाडी मिळवली. मध्यांतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने ही आघाडी कायम राखली. त्यानंतर सेकंड क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आणखी तीन गोल करत हिंदुस्थानला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. हिंदुस्थानकडून एकमेव गोल 34 व्या मिनिटाला रुपिंदर पाल याने केला होता.

नेमबाजीत निराशा, मनु भाकर आणि सौरभ चौधरीची जोडी स्पर्धेबाहेर फेकली गेली

टोकियो ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी हिंदुस्थानचे नेमबाज स्पर्धेबाहेर गेले आहेत. मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांची जोडी मेडल राऊंडमधून बाहेर गेली आहे. या जोडीची सुरुवात चांगली झाली होती. या दोघांनीही 10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड टीमच्या क्वॉलिफिकेशन राऊंडचा पहिला टप्पा पार केला होता आणि ते दुसऱ्या टप्प्यात पोहोचले होते. पण, इथे मात्र त्यांची खेळाची कमाल फिकी पडली आणि हे दोघंही मेडल राऊंडमधून बाहेर गेले.

सौरभने पहिल्या टप्प्यात 296 तर मनुने 286 गुणांची कमाई केली होती. सर्वोत्तम आठ टीम्स क्वालिफिकेशनच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या. प्रत्येक नेमबाजाला दोन सीरीजमध्ये 10 वेळा नेम लावण्याची संधी मिळाली.दुसऱ्या टप्प्यात नेम लावण्याच्या दोन्ही सीरीजमध्ये अनुक्रमे 92 आणि 94 असे एकूण 186 गुण मिळवले. तर सौरभने अनुक्रमे 96 आणि 98 असे 194 गुण पटकावले. एकूण चार सीरीजमध्ये या जोडीला फक्त 380 गुण मिळवता आले. त्यांच्या सोबतच्या दोन संघांनी ही फेरी पूर्ण केली. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या टीम्स कांस्यपदकासाठी लढणार आहेत.पहिल्या टप्प्यात मनु आणि सौरभच्या जोडीने सातवा क्रमांक पटकावला. मेडल राउंडमध्ये चारच संघ निवडले जातात. या चार संघांमध्ये मनु आणि सौरभचा समावेश होऊ शकला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या