शिवसेनेच्या मागणीला यश, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आजपासून टोलमाफी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मागणीला यश आले असून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना उद्या, गुरुवारपासून टोलमाफी देण्यात येणार आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर 19 सप्टेंबरपर्यंत ही सवलत लागू असणार आहे.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा टोलमाफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असतानाही टोलमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत होती. यापार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी मुंबई व अन्य भागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी टोलमाफीची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला यश आले असून त्यासंबधीचा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे.