टोमॅटोचा भाव पुन्हा कोसळला; शेतकरी संतापला, भाजी मंडईतच आंदोलन

tomato-latur

टोमॅटोच्या दरात पुन्हा एकदा झालेली घसरण ही शेतकऱ्यांना चांगलीच महागात पडत आहे. दीड दोन महिन्यापूर्वी 150 ते 200 रुपये किलोनं विकला जाणाऱ्या टोमॅटोचा दर भाजी मंडईत आता 80 पैसे इतका खाली आला आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी थेट भाजी मंडईतच आंदोलन सुरू केलं.

लातूर बाजारपेठेतील ही घटना असून टोमॅटोला अवघा 80 पैसा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजी मंडईतच आंदोलन सुरू केलं. 25 ते 30 किलोच्या कॅरेटला फक्त 120 ते 150 रुपयांचा भाव मिळाल्याचं चित्र आहे. लातूरच्या बाजारपेठेत पाच ते सात हजार क्रेट टॉमॅटोची आवक झाली असून भाव नसल्यानं भाजी मंडईतच टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

टोमॅटोतून नफा तर दूरच राहिली, मात्र लागवड खर्च आणि वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.