उद्या मंत्रिमंडळ विस्तार; कोण येणार, कोण जाणार…

79

सामना विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली

अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदलाला मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान ‘ब्रिक्स’साठी रविवारी उड्डाण घेण्यापूर्वी सकाळी १० वाजता राष्ट्रपती भवनात हा मंत्रिमंडळ विस्तार होईल. राजधानीत मात्र राजकीय पतंगबाजीला ऊत आला आहे. कोण येणार, कोण जाणार… याची जोरदार चर्चा सुरू आहे.

खराब कामगिरीच्या मुद्द्य़ावरून सहा मंत्र्यांचे गुरुवारीच राजीनामे घेण्यात आले होते. अजूनही काही मंत्री डेंजर झोनमध्ये असल्याचे सांगण्यात येते. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे ते मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

प्रभूंच्या नशिबी गंगासेवा किंवा वनसेवा
सुरेश प्रभूंच्या रेल्वेमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभूंकडून अपेक्षाभंग झालेल्या पंतप्रधानांनी त्यांना मंत्रिमंडळातूनच डच्चू द्यायचे ठरविले होते, मात्र प्रभूंनी ऐनवेळी डॅमेज कंट्रोल करण्यात यश मिळविले. उमा भारतींनी राजीनामा दिलेल्या गंगा शुद्धीकरण व जलसंधारण खात्यात प्रभूंची रवानगी होईल असे मानले जात आहे किंवा अनिल दवेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पर्यावरण खात्याचीही धुरा त्यांच्याकडे सोपविले जाईल अशीही एक शक्यता आहे.

मी काही ऐकले नाही, काही बोलणार नाही- उमा भारती
मंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या उमा भारती यांनी त्यांचा पंतप्रधांनांनी राजीनामा घेतल्याबद्दल नाराजीला ट्विटरवरून मोकळी वाट करून दिली. मी काही ऐकले नाही, मी काही बोलणार नाही, मला काही माहिती नाही अशा शब्दांत त्यांनी नाराजीला मोकळी वाट करून दिली.

विधानसभा निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवून
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासूनचा हा मोदी मंत्रिमंडळाचा तिसरा व कदाचित २०१९ च्या निवडणुकीपूर्वीचा अखेरचा विस्तार असेल. गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यांत आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचे ती सेमिफायनलच असेल. त्यामुळे या राज्यांत चमकदार कामगिरी व्हावी यासाठी या राज्यांना मंत्रिमंडळात व्यापक प्रतिनिधित्व मिळेल असे मानले जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन मंत्रिमंडळाची रचना असेल, असे सांगण्यात येत आहे.

अण्णा द्रमुक व संयुक्त जनता दलाला स्थान
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अण्णा द्रमुक व संयुक्त जनता दलाला प्रतिनिधित्व मिळणार आहे. अण्णा द्रमुककडून लोकसभेचे उपसभापती तंबी दुराई व राज्यसभेतील खासदार मैत्रयन यांची नावे पाठविण्यात आल्याचे समजते. संयुक्त जनता दलालाही मंत्रिमंडळात संधी दिली जाईल. आर. पी. सिंग यांच्यासह वशिष्ठ नारायणसिंह यांना संधी मिळेल, असे सांगितले जाते.

भाजपचे संभाव्य नवे मंत्री
– कर्नाटक – सुरेश अंगडी किंवा प्रल्हाद जोशी, शोभा कारंदलजे.
– मध्य प्रदेश- प्रभात झा, प्रल्हाद पटेल किंवा राकेश सिंग.
– हिमाचल प्रदेश – प्रेमकुमार धुमल किंवा त्यांचे चिरंजीव अनुराग ठाकूर.
– राजस्थान – ओमप्रकाश माथूर, भूपेंद्र यादव किंवा राम माधव.
– गुजरात – भारती स्याल
– बिहार – आर. के. सिंग,
– उत्तर प्रदेश – सत्यालसिंग (दोघेही माजी प्रशासकीय व पोलीस अधिकारी).

आपली प्रतिक्रिया द्या