शिरीषायन – लताची दहा सर्वश्रेष्ठ गाणी

>>शिरीष कणेकर

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर 28 सप्टेंबर रोजी वयाची 92 वर्षे पूर्ण करीत आहेत.

आग्रह करू नका. दया करा. सोडा मला. रहेम मेरे आका, रहेम!

लता मंगेशकरची सर्वोत्कृष्ट (म्हणजे मला सर्वश्रेष्ठ वाटतात ती!) हिंदी सिनेमातील गाणी सांगायला सांगू नका. मी आवाज नसताना गात सुटीन- ‘मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला.’ मला सर्वाधिक भावणारी दहा गाणी काढायला सांगितलीत तर मी हातात नसलेली शस्त्रे टाकून देऊन शरण येईन. वास्तविक हा माझा सर्वांत लाडका व हवाहवासा वाटणारा खेळ आहे. त्यात जग विसरायला लावण्याची ताकद आहे. मन सुगंधित वाटिकेत झोके घ्यायला लागतं. एरवी तडतडणारा मेंदू धुंदफुंद होतो. देह कापसासारखा हलका होऊन हवेत तरंगायला लागतो. ब्रह्मानंदी टाळी लागते. धमन्यांतून अमृत वाहू लागते. अमरपट्टा डोळय़ांनी दिसू लागतो. मोक्ष आसपासच आहे असे भास व्हायला लागतात.

या आनंदनिर्भर अर्धजागृत अवस्थेतच मनाचा अभूतपूर्व छळ सुरू होतो. काळजाचे ठोके वाढून ते शाळेच्या घंटेएवढय़ा मोठय़ाने आपल्यालाच ऐकू येतात. कुठेतरी पळून जाऊन स्वतःपासूनच लपून बसण्याची ऊर्मी मनात दाटून येते. का हे नसते संकट आपण ओढवून घेतलं असं आक्रंदन करीत आपलं मन आपल्यालाच विचारत राहतं. दैवी आनंदाचा भाग म्हणून अशक्य गोष्ट करायची म्हणता? नंतर कुठली एकापेक्षा एक भारी गाणी राहून गेली याचा विचार करून कपाळ बडवायची वेळ येणार ना?

आपलं दस्तुरखुद्द लताला चॅलेंज आहे. तिनं तिची सर्वोत्कृष्ट दहा गाणी निवडून दाखवावीत. शक्यच नाही आणि समजा निवडलीच तर ती आमच्यासारख्या लताच्या परमभक्तांच्या पसंतीला उतरतील याची काय गॅरंटी? तिच्यापेक्षा तिच्या गाण्यांवर आमचा जास्त व्यासंग व जास्त अधिकार आहे असं वाटण्याच्या थराला आम्ही पोहोचलोय. ‘अमूक एक गाणं तुम्ही घेतलं नाहीत?’ असं अविश्वासाच्या सुरात तिला दरडावून विचारायला आम्ही कमी करणार नाही. तिची पूजा करता करता आम्हीही पूजेलायक झालोय अशीही आमची भावना आहे. ‘झुक गया आसमाँ’मधील (माझ्या मते) सामान्य गाणं लताला आवडतं कळल्यावर मी फोनमधून किंचाळलो होतो – ‘काय?’ त्यावर दुखावून लता म्हणाली होती, ‘म्हणजे काय, मला माझी आवड असू शकत नाही का?’ अरे हो, मला वाटत होतं उजवं-डावं आम्हीच ठरवायचं. क्या समझते हो अपने आपको, गली के कुत्ते?

मागे लताच्या 87 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तिच्या निवडक 87 गाण्यांची यादी छापली होती. तुलनात्मकदृष्टय़ा हे खूप सोपं होतं. खूप छान छान गाण्यांचा मी समावेश करू शकलो होतो. तरीही माझ्या काळजातील काही उत्तमोत्तम गाणी राहून गेल्याची मला खंत होती. मी तरी काय करणार? तिनं हिरेमाणकेच एवढी उधळलीत की, ती सगळी सामावून घ्यायला माझा पदर तोकडा पडतो. हे घेतलं तर ते राहिलं, ते घेतलं तर हे रहिलं अशी तिरपीट उडते. प्रत्येक वेळी विक्षिप्त, पण ‘जिनियस’ संगीतकार सज्जाद हुसेनला भेटलो की, त्याच्यासमोर ‘सैंया’ या आज प्रिंटही अस्तित्वात नसलेल्या मधुबालाच्या तोंडी असलेल्या लताच्या ‘तुझे दिल दिया’ या गाण्याच्या आठवणी काढून मी माझी जाणकारी दाखवायचो. प्रत्येक वेळी तो म्हणायचा, ‘काली काली रात रे’ ऐक. मी ऐकलं व तृप्त झालो.

अवघ्या दहा गाण्यांत ‘बेस्ट ऑफ लता’ बसवायची? एखादा मायावी राक्षसही हे करू शकणार नाही. नौशाद, एस. डी. बर्मन, मदन मोहन, शंकर – जयकिशन, सी. रामचंद्र, रोशन यांची एकेकटय़ाची लताने गायलेली दहा गाणी काढायला गेलं तरी शक्य नाही. त्यांची अनेक उत्तम गाणी बाहेर राहतील. मग सगळय़ा संगीतकारांची मिळून दहा गाणी कशी शक्य आहेत? बुलो सी रानी (‘मांगने से जो मौत मिल जाती’ – ‘सुनहरे कदम’ – लता), हंसराज बहेल (‘हाय जिया रोये’ – ‘मिलन’ – लता), श्यामसुंदर (‘साजन की गलिया’ – ‘बाजार’ – लता), सज्जाद (‘जाते हो तो जाओ’ – ‘खेल’ – लता), गुलाम महंमद (‘इन्हीं लोगों ने’ – ‘पाकिजा’ – लता), विनोद (‘कागा रे’ – ‘वफा’ – लता), वसंत देसाई (‘मैं सागर की मस्त लहेर’ – ‘धुंवा’ – लता) आणि हुस्नलाल भगतराम (‘ऐ मेरी जिंदगी’ – ‘आदिल-ए-जहांगीर’ – लता) या गुणाढय़ संगीतकारांकडची लताची उत्कृष्ट दहा गाणी एकवेळ काढता येतील, पण मदन मोहनची फक्त दहा रत्ने निवडणार?

त्यापेक्षा एका संगीतकाराकडचं एकच गाणं घ्याचं असं स्वनियंत्रण राखलं तर निदान दहा संगीतकारांना आपण न्याय दिला यात आपण समाधान शोधू शकतो. या मार्गानं सुधीर फडके (‘बांध प्रीती फुलडोर’ – ‘मालती माधव’ – लता), जमाल सेन (‘सपना बन साजन आये’ – ‘शोखियां’ – लता), के. दत्ता (‘तिरुलिल्ला तिरुलिल्ला’ – ‘दामन’ – लता), बसंत प्रकाश (‘मेरी बीना के सूर सात रे’ – ‘सलोनी’ – लता), अली अकबर खान (‘है कहीं पर शादमानी’ – ‘आँधियां’ – लता) हे संगीतकार एका गाण्याच्या बळावर अनिल विश्वास, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन यांच्या पंक्तीत मांडीला मांडी लावून बसणार? मनाला पटत नाही.

जाऊ दे झालं. या फंदातच पडूया नको. मी सुरुवातीला म्हटलंय तेच पुन्हा म्हणतो – आग्रह करू नका. दया करा. सोडा मला. रहेम मेरे आका, रहेम! लताची सर्वश्रेष्ठ दहा गाणी काढण्याचा नसता उपद्व्याप दुसऱ्या कोणाला करू द्या. मी त्याची यादी काळजीपूर्वक वाचीन व मग त्यात अमूक गाणी नाहीत, तमूक गाणी नाहीत म्हणून बोटं मोडीन, शिव्या देईन.

[email protected]