कासवांची जत्रा

155

सामना ऑनलाईन, वेंगुर्ले

सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आणि इथल्या समुद्रकिनाऱ्यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. इथले स्वच्छ,
सुंदर व शांत समुद्रकिनारे देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करू लागले आहेत. त्यामुळे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी व मनाचे मनोरंजन करण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटन या उपक्रमात स्थानिकांचा सहभाग वाढावा, त्यांना रोजगार मिळावा यासाठी वायंगणी ग्रामस्थांच्या सहकार्याने किरात ट्रस्ट व लुपिन फाऊंडेशन तर्फे कासव जत्रा हा अभिनव उपक्रम वायंगणी किनाऱ्यावर मोठ्या उत्साहात पार पडला.

येथे आलेल्या निसर्गप्रेमी पर्यटकांना डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारी, जंगलातील पशुपक्षी, वनौषधी झाडांची माहिती देण्याबरोबरच सायंकाळच्या वेळेला स्थानिक संस्कृतीची ओळख करून देणारे दशावतार, फुगडी, नेरुर येथील शिमगोत्सवातील खेळ, मालवणी गाणी असे कार्यक्रम सादर करण्यात आले. पर्यटकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला.

मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची छोटी छोटी पिल्ले, समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ हे सर्व महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यातून आलेल्या पर्यटकांनी याचि देही, याचि डोळा अनुभवले.

कासवांच्या जन्माबरोबरच जंगल सफर, वायंगणी समुद्रातील डॉल्फिन दर्शन, वेंगुर्ले-मांडवी खाडीतील कांदळवन सफर, बोटिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थांचा आस्वादही पर्यटकांनी घेतला. कासव जत्रेत सहभागी होत असलेल्या पर्यटकांच्या निवासाची सोय येथील स्थानिक लोकांच्या घरी करत असल्याने निवास योजना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात रुजू होत असल्याचे चित्र दिसत आहे.

वायंगणी येथील कासव जत्रा हा उपक्रम स्थानिकांना हंगामी रोजगार उपलब्ध करून देत असल्याने विशेष लक्षवेधी ठरत आहे. यातून स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळते आहेच पण त्यासोबत देशी विदेशी पर्यटकांनाही जिह्यातील विविधता पाहण्याची संधी प्राप्त होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनातून समृद्धीकडे नेण्यासाठी अनेक पर्याय शोधले जात आहेत. त्यातील आजपर्यंत सिंधुदुर्ग हा प्रामुख्याने हापूस आंबा, फणस व कोकमच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पण आता मात्र या सर्वांच्या जोडीला सिंधुदुर्गची नव्याने ओळख निर्माण होत आहे ती म्हणजे वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे होणाऱ्या कासव जत्रेने.

लहानपणी ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट आपण ऐकली असेल. या शर्यतीत कासवाची स्पर्धा फक्त सशाशी होती. या शर्यतीत कासव जिंकतो. पण प्रत्यक्षात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची जगण्याची शर्यत जन्माच्या अगोदरच सुरू होते. वायंगणी गावातील सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी कासव संवर्धनाचे प्रयत्न कित्येक वर्षे करीत आहेत. अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या प्रजातीचे संरक्षण मानव हितासाठी गरजेचे आहे. हा प्रयत्न मर्यादित स्वरुपात न रहाता कासव जत्रेच्या निमित्ताने सर्वदूर पोहचत आहे. लोकांना याचे महत्त्व पटत आहे. कासवांच्या जगण्याची शर्यत अवघड असली तरी ऑलिव्ह रिडलेंची छोटी पिल्ले निसर्गप्रेमींच्या मदतीने ही शर्यत जिंकत आहेत.

आपलेपणाची वागणूक
कासव जत्रेला येणाऱ्या पर्यटकांची राहण्या, जेवण्याची सोय गावातील ग्रामस्थांकडे केली होती. ग्रामस्थांनीही पर्यटकांना आपलेपणाची वागणूक देऊन त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यांना इथले लज्जतदार मासे, कोकणी गोड पदार्थ तसेच न्याहारीमध्ये आंबोळी-चटणी, वडे-उसळ, तांदळाच्या पिठापासून बनणाऱ्या शेवया असे पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून दिल्याने पर्यटकांना इथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता आला. तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था इथल्या घरात आणि सहभोजनाची सोय घरासमोरील मंडपात केल्याने पर्यटकांना ग्रामीण जीवन अनुभवता आले.

वायंगणी गावातील ग्रामस्थांकडून आपलेपणाची वागणूक मिळते. त्यामुळे एवढ्या लांबून येऊनही परके असल्याची खंत रहात नाही. इथले घरगुती वातावरण मनाला आनंद देते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी दरवर्षी येत आहोत. – सायली पटवर्धन, पुणे.

वायंगणी हे कासव संवर्धनाचे भारतातले महत्त्वाचे केंद्र व्हावे, स्थानिकांना रोजगार देणाऱया निसर्गपर्यटनाला शासनाने मदत करावी. किनारपट्टीलगतच्या रस्त्यावर प्रामुख्याने पथदीपांची सोय व्हावी.- सुहास तोरसकर, कासवमित्र

वायंगणी हे स्थायी स्वरुपाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारुपाला यायला हवे असेल तर या भागात जागतिक दर्जाचे बांबूचे बांधकाम करून कासव संग्रहालय झाल्यास सर्वांसाठी ते आकर्षण ठरेल. – शशांक मराठे, सचिव-किरात ट्रस्ट.

आपली प्रतिक्रिया द्या