…अन् ‘लाडू’ पुन्हा आनंदाने खेळू लागला! ‘एग बाऊंड सिंड्रोम’ने ग्रस्त कासवावर यशस्वी ‘लॅप्रोस्कोपिक’ शस्त्रक्रिया

गेल्या सहा महिन्यांपासून ‘एग बाऊंड सिंड्रोम’ने ग्रस्त असलेल्या कासवावर (लाडू) पुण्यातील स्मॉल ऑनिमल क्लिनिकमध्ये यशस्वी ‘लॅप्रोस्कोपिक’ शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेमुळे ‘लाडू’ला पूर्ववत जीवन मिळाले असून, तो पूर्वीसारखा खेळू आणि हालचाल करू लागला आहे. पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली.

एग बाऊंड सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या ‘लाडू’ नावाच्या कासवाचे खाणे-पिणे कमी झाले होते. या आजारामुळे नीट खाता येत नसल्याने हे कासव अशक्त होऊन, त्याची हालचाल कमी झाली होती. त्यामुळे या कासवाला स्मॉल ऑनिमल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर क्ष-किरण आणि अल्ट्रासाऊंडमध्ये तपासणी करण्यात आल्यानंतर डॉ. नरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमने लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करीत कासवाचे प्राण वाचविले.

डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, ‘कासवाला आमच्याकडे आणले तेव्हा ते चिंताजनक, अशक्त अवस्थेत होते. त्याची हिमोग्लोबिन पातळी कमी झाली होती. कासवावर कवच न कापता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने लॅप्रोस्कोपिक एग बाऊंड शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातील अंडी काढण्यात आली व त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार तासांत कासवाची प्रकृती पूर्ववत झाली.