मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्याचा महिलेवर अत्याचार

सामना प्रतिनिधी । ठाणे

मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याचा गैरफायदा उठवत सहकारी महिलेवर एक वर्षापासून वारंवार बलात्कार करणाऱ्या दत्ताराम शिंदे याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरी येथील ओशिवरा भागात असलेल्या सेरेनिटी कॉम्प्लेक्समध्ये मुंबई पालिकेचे दुय्यम अभियंता दत्ताराम शिंदे राहतात. त्याने पदाचा दुरुपयोग करत ठाण्यात राहणाऱ्या ३९ वर्षीय सहकारी क्लार्क महिलेशी जवळीक वाढवली. त्यातून पीडित महिलेवर शिंदे यांनी ऑक्टोबर २०१६पासून जून २०१७पर्यंत तिच्या घोडबंदर येथील आझादनगर भागात असणाऱ्या राहत्या घरी वारंवार अत्याचार केला. शिंदे याने पीडित महिलेवर शीतपेयातून गुंगीचे औषध देत वर्षभर अत्याचार सुरूच ठेवले. त्याचवेळी तिच्याशी लग्नाचे नाटक करून तिचा पती म्हणून शिंदे वावरत होता. अखेर महिलेने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिचे आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी शिंदेने तिला देताच तिने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी कासार वडवली पोलिसांनी तत्काळ दखल घेत त्याला अटक केली.