पर्यटन पोलिसांकडूनच पर्यटकांची आर्थिक लूट

13

सामना ऑनलाईन, संभाजीनगर ।

देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमलेले पर्यटक पोलीस पर्यटकांचीच वाहने अडवून त्यांची आर्थिक लूट करत आहेत.
देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांचे अपहरण करणे, त्यांचे पैसे व साहित्य हिसकावणे, लुटमार करण्याचे प्रकार होत असल्याने परदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पर्यटकांना स्थानिक गुंड व लुटमार करणाऱ्यांकडून कोणताही त्रास होऊ नये यासाठी ग्रामीण पोलीस विभागाने खास पर्यटन पोलीस वाहन तैनात केले असून, या वाहनात काही पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या वाहनातून पोलिसांनी पर्यटन स्थळावर पेट्रोलिंग करून पर्यटकांना त्रास देणाऱ्या उपद्रवींविरुद्ध कारवाई करावी. ज्यामुळे पर्यटकांना सुरक्षित वाटेल व पर्यटन वाढेल, असा उद्देश आहे. परंतु हे पोलीसच तालुक्यातील वेरूळ, म्हैसमाळ, रत्नपूर यासह दौलताबाद या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची वाहने तपासणीच्या नावाखाली थांबवून ठेवतात. सर्व बाबींची पूर्तता असतानाही कारवाईची धाक दाखवून त्यांची आर्थिक लुबाडणूक करतात. यातील बहुतांश वाहने परदेशी व बाहेर राज्यातील पर्यटकांची असतात. विनाकारण त्रास नको म्हणून पोलिसांची मागणी पूर्ण करून पर्यटक आपली सुटका करून घेतात. पर्यटक वाहनांना स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांचा आधीच त्रास असून, त्यात आता पर्यटन पोलिसांची भर पडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याची या पोलिसांवर नजर राहावी यासाठी त्यांच्या वाहनावर सीसीटीव्ही व जीपीआरएस लावण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या