पर्यटकांना मिळणार महाबळेश्वरच्या जंगल सफारीचा आनंद, उपवन संरक्षक महादेव मोहिते यांची माहिती

निसर्गसौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरचे चोहोबाजूंनी वेढलेले सदाहरित घनदाट जंगल पाहण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु, वन विभागाच्या नियमांमुळे जंगलात जाऊन जंगलाची सफर करणे शक्य होत नाही. परंतु, आता ही सुविधा वन विभागाच्या वतीने सरू करण्यात येणार आहे. जंगलातील राईडची दुरुस्ती करून गाईडसह पर्यटकांना आता जंगलाची सफर करून जंगल व जंगलातील प्राणी पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.

सहायक वनसंरक्षक या पदावर काम केलेले महादेव मोहिमे यांची नुकतीच सातारा जिल्ह्याच्या उपवनसंरक्षकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्रामगृहावर संयुक्त वनव्यवस्थापन महासमिती व वन अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महादेव मोहिते म्हणाले, वन समितीच्या सदस्यांनी केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेतले. महाबळेश्वर हे पर्यटनावरच अवलंबून असल्याने जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या पॅनेलवर असलेले नागपूर येथील आर्किटेक्ट अशफाक मोहंमद यांनी महाबळेश्वरची पाहणी केलेली आहे. त्यांनी सुचविलेल्या नवीन योजनांबाबत त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

लॉडविक पॉइंट ते प्रतापगड रोपवे हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत. या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. महाबळेश्वरसाठी राज्य शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी काही रक्कम वान विभागाकडेदेखील येणार आहे. त्या रकमेतून पर्यटकांसाठी काही प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. अशा प्रस्तावांवर या बैठकीत चर्चा झाली असून, हे प्रस्ताव लवकरात लवकर राज्यशासनाकडे सादर केले जाणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

बैठकीला वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, वन व्यवस्थापन समितीचे शांताराम धनावडे, विलास मोरे, पंढरीनाथ लांगी, कादर सय्यद, नाना वाडेकर, रमेश चोरमले, विष्णू भिलारे, विलास भिलारे, अनिल भिलारे, विजय भिलारे धनंजय केळगणे, संजय केळगणे आदींसह वनअधिकारी उपस्थित होते.या गोष्टींचा होणार विकास

आर्थरसीट येथे काचेची प्रेक्षागॅलरी तयार करता येईल का? किंवा परदेशातील धर्तीवर काही नवीन प्रकल्प तयार करता येतो का? हे पाहिले जाणार आहे. हेलन पॉइंट, बॉबिग्टन पॉइंट यासारख्या दुर्लक्षित पॉइंटचा विकास करण्यात येणार आहे. गव्यांचे प्रमाण वाढले असून, ते मानवी वस्तीत येऊ नये यासाठी जंगलातच गवताची लागवड करून विकसित करण्यात येणार आहे. वनप्राण्यांसाठी वनपाणवठे तयार करण्यात येणार आहे. वन विभागाच्या ताब्यातील शासकीय विश्रामगृह चालविण्यासाठी वन समितीकडे हस्तांतर करणार आहेत. जंगलातील पाऊलवाटा व अस्तित्वात असलेले रस्ते यांची दुरुस्ती करणार आहे. आवश्यक तेथे पर्यटकांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. ज्या पॉइंट्सची पडझड झाली आहे, त्यांची तातडीने दुरुस्ती करणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तिथे संरक्षक कठडे बांधणार आहे. वन विभागाच्या वाहनतळांचे योग्य नियोजन करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या