टोयोटा आणणार बाजारात दोन सीटवाली इ-कार

2396

प्रदूषणाच्या समस्येने फक्त हिंदुस्थानातीलच नाही तर जगभरातील अनेक शहरे त्रस्त आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून जगभरात विजेवर धावणाऱ्या गाड्यांच्या उत्पादनाला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या टोयोटानेही ही वाट धरली असून या कंपनीने दोन सीटची क्षमता असलेली इलेक्ट्रीक कार तयार केली आहे. सध्या या गाडीचे प्रारुप तयार करण्यात आले भविष्यातील ही कार टोकियो मोटर शो ला सुरुवात होण्याआधी सामान्य नागरिकांसमोर मांडण्यात आले आहे.

टोयोटाने अल्ट्रा कॅाम्पॅक्ट बॅटरी इलेक्ट्रिक व्हीकल (BEV) पद्धतीची गाडी तयार केली असून ही गाडी आकाराने लहान आणि कमी खर्चात जास्तीत जास्त अंतर कापणारी असावी यासाठी कसोटीने प्रयत्न केले आहेत. दिसायला ही गाडी टाटाच्या नॅनोप्रमाणे असून नॅनोप्रमाणेच दोन सीटची कार असल्याने या गाडीला दोनच दरवाजे असतील. या गाडीचे प्रदर्शन 24 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टोकीओ मोटर शोमध्ये करण्यात येणार आहे. तिथे या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो हे टोयोटा कंपनी पाहणार आहे. असा अंदाज आहे की 2020 पर्यंत ही गाडी बाजारामध्ये विक्रीसाठी आणण्यात येईल. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 100 किलोमीटरचे अंतर कापू शकेल. यामुळे इंधनाची मोठी बचत होणार आहे. या गाडीचा सर्वाधिक वेग हा 60 किलोमीटर प्रतितास असणार आहे असे या गाडीची निर्मिती करणाऱ्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या