‘जीएसटी’ला व्यापाऱ्यांची आंदोलनाने सलामी, कानपूरमध्ये रेल रोको, मध्य प्रदेश, राजस्थानात बंद

8

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मोदी सरकार उद्यापासून अमलात आणत असलेल्या ‘जीएसटी’ म्हणजे नव्या कर प्रणालीच्या स्वागतालाच आज देशभरातील व्यापाऱ्यांनी आंदोलनाची सलामी दिली. विशेष म्हणजे जीएसटीविरोधातील हे आंदोलन भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांतच आधी पेटले आहे.

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे व्यापाऱ्यांनी ४१०२ झांशी एक्प्रेस अडवून रेल रोको केल्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आग्र्यातील व्यापाऱ्यांनी ‘बंद’ पाळत ‘जीएसटी’च्या घाईने करण्यात येत असलेल्या अंमलबजावणीला विरोध केला. उद्या गाझियाबादमध्ये व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली असून जीएसटीमध्ये काही सुधारणा करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये व्यापाऱ्यांनी आज बंद पाळला. दुकाने, बाजारपेठा बंदच होत्या. तसेच राजस्थानातील जयपूर, उदयपूर, अलवार, सिकर, जोधपूर, कोटा आदी जिल्ह्यांतही व्यापाऱ्यांनी बंद पाळला, अशी माहिती ट्रेडर्स असोसिएशनचे प्रवक्ते अरुण अगरवाल यांनी दिली.

सुरतमध्ये कापड व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून बंद पाळला असून जीएसटी मागे न घेतल्यास बेमुदत बंदचा इशारा आज दिला. दिल्लीच्या चांदणी चौकातील कापड बाजारातील व्यापाऱ्यांनीही गेले सलग तीन दिवस बंद पाळला आहे. जीएसटीची अंमलबजावणी जुलैऐवजी सप्टेंबरमध्ये करण्यात यावी अशी तमाम व्यापाऱयांची मागणी आहे.

अंमलबजावणीची घाई निव्वळ तमाशा
नोटाबंदीप्रमाणेच कोणत्याही पूर्वतयारीशिवाय ‘जीएसटी’ लागू करण्यात येत आहे. एका अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकारने केलेली घिसाडघाई म्हणजे निव्वळ तमाशा आहे, अशा शब्दांत काँगेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर हल्ला चढवला. ‘जीएसटी’मध्ये आणखी बरेच काही करता येण्यासारखे आहे. मात्र केवळ आपला प्रचार करण्यासाठीच भाजपचे सरकार घाईघाईत जीएसटी लागू करत आहे असा आरोपही त्यांनी केला.

मध्यरात्रीचे संसद अधिवेशन कशाला?
हिंदुस्थानने अणुचाचण्या यशस्वी केल्या, देशाने अवकाश संशोधनात ठसा उमटवला, आर्थिक सुधारणा घडवल्या. अशा महत्त्वाच्या अनेक घडामोडी घडल्याचे सर्वांनी पाहिले. त्यावेळी संसदेचे मध्यरात्रीचे अधिवेशन कधीच भरवले गेले नाही. मग ‘जीएसटी’साठीच त्याचा खटाटोप कशासाठी, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आज केला. देशाने आजवर चमकदार कामगिरी करून जगात शान जशी वाढवली तशीच अनेक समस्यांशी झुंज दिली, पण संसदेचे मध्यरात्रीचे अधिवेशन कधीही भरवले गेले नाही असे त्यांनी सांगितले. राष्ट्राची परंपरा आणि संसदीय शिष्टाचाराची बूज राखण्यासाठीच काँग्रेसने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या जीएसटीच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. १९७१ सालात हिंदुस्थानपुढे पाकिस्तानी सैन्याने युद्धात शरणागती पत्करली. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या विजयानंतरही इंदिरा गांधी यांनी संसदेचे मध्यरात्रीचे अधिवेशन बोलावले नव्हते, असेही शर्मा यांनी सांगितले.

मोदीच म्हणाले होते ‘जीएसटी’ यशस्वी होणार नाही!
‘जीएसटी’ लागू करण्यासाठी केंद्रातील भाजप-एनडीएचे सरकार उतावळे झालेले असतानाच काँग्रेसने आज ‘जीएसटी’च्या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच अक्षरशः उघडे पाडले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी ‘जीएसटी कदापि यशस्वी होऊ शकत नाही’ असे मत मांडले होते. त्याचा व्हिडीओच काँग्रेसने ‘जीएसटी तमाशा’ या हॅश टॅगसह ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केला. इतकेच नव्हे तर ‘हे आहे मोदी आणि भाजपचे जीएसटीबद्दलचे खरे मत’ अशी कॅप्शनही त्या व्हिडीओखाली काँग्रेसने दिली आहे. मोदीजी, तुमचेच शब्द तुम्ही विसरलात काय, असा सवालही पंतप्रधानांना काँग्रेसने केला आहे.

मोदी काय म्हणाले होते?
माहिती-तंत्रज्ञानातील पायाभूत सुविधांचा विकास करून देशभरातील करदात्यांचे जाळे तयार केले जात नाही तोपर्यंत ‘जीएसटी’ यशस्वी होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या