पारंपरिक ‘होळी’ वातावरण शुद्धीसाठी आवश्यकच!

>> प्रा. अरविंद कडबे

आज आमच्यापैकी अनेक जण होळीचा सण आला की कचऱयाची होळी करा, अशी हाकाटी देतात. आपण सर्वजण वर्षभर कचरा जाळत असतो. कचरा जाळणे व होळी पेटवणे यात खूप फरक आहे. आमच्या पूर्वजांनी होळीचा सण हा शुद्ध हवा तयार करण्याचा एकप्रकारे हिंदू पारंपरिक पद्धतीने हजारो वर्षांपासून चालत आलेला सामूहिक यज्ञच आहे. आमचे पूर्वज द्रष्टे होते व त्यामुळेच जगाचे पर्यावरण संतुलित होते हे यावरून सिद्ध होते.

आजचे तथाकथित विज्ञानवादी कोणत्याही गोष्टीच्या खोलात न शिरताच हिंदुस्थानी हिंदू परंपरांना विरोध करतात. वर्षभर फर्निचरसाठी, कागद तयार करण्यासाठी व विविध प्रकारे औद्योगिक वापरासाठी लाकडाचा वापर सुरू असतो त्यावर आम्ही कोणतेही नियंत्रण ठेवत नाही. श्रीमंत देशांनी सर्वात जास्त निसर्गाचे शोषण करून प्रगत राष्ट्राचा आव आणून आम्हाला आज ग्लोबल वॉर्मिंगला सामोरे जाण्यास भाग पाडले. निसर्गाच्या रक्षणामध्ये जंगलाचे महत्त्व आता आम्हाला जाणवायला लागले आहे. पैसा आला की माणूस सुविधांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच कोणताही विचार न करता पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशा अनेक उपकरणांचा सहज उपयोग केला जातो. नैसर्गिक वातावरण चांगले असतानाही एअर कंडिशनरची सवय लावून घेणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या एअर कंडिशनरमुळे इतरांना फुकटात प्रदूषण मिळते. मोठमोठय़ा मॉल्समध्ये जाताना आम्हाला थंड वातावरण आवडते, परंतु त्यामुळे  होणारे पर्यावरणाचे नुकसान कोणीही विचारात घेत नाही. हेच नाही तर प्रदूषित सांडपाणी, घनकचरा, प्लॅस्टिकचा कचरा असे अनेक प्रकारचे प्रदूषण पसरवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर एक दिवस पारंपरिक होळी करण्याऐवजी कचऱयाची होळी करा असे आवाहन करणाऱया लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यांनी आपली पारंपरिक होळी समजून घेण्याची आवश्यकता आहे.

आमची पारंपरिक होळी ही गावराणी गाईच्या शेणाच्या गोवऱया जाळणे म्हणजे हवा शुद्ध करण्याचा पहिला महत्त्वाचा घटक आहे. त्यावर लाकूड जाळले की लाकडाच्या प्रकारानुसार हवा शुद्ध होण्यास मदतच होते. त्यात गाईचे थोडे तूप टाकल्यास हवा १०० टक्के शुद्ध होते म्हणून हिंदुस्थानात हजारो वर्षांपासून होळी पेटवणे हा हवा शुद्ध करण्याचा अर्थातच वातावरण शुद्ध करून नियमित पाऊस पाडण्याचा शास्त्रीय उपाय आहे. साधारणतः फाल्गुन (मार्च) महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदुस्थानात हा सण साजरा होत असल्याने सार्वत्रिक हवा शुद्ध होणे म्हणजेच एक प्रकारचा सामूहिक महायज्ञच आहे. निसर्गतः वेगवेगळय़ा वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म व प्राणवायू असतो व त्यांचा उपयोग आपण मानवाच्या रोगाच्या उपचारासाठी आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे करीत आलो आहोत. हे औषधी गुणधर्म वनस्पतींच्या वेगवेगळय़ा रूपात आम्हाला उपयोगी ठरतात. झाडाच्या पानांचा रस, मुळे, फळ, फुले, फांद्या, खोड आणि बीज यापासून आम्ही पारंपरिक औषध विज्ञान विकसित केले व लाखो वर्षांपासून त्याचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे वाळलेल्या विशिष्ट झाडांची होळी ही त्या झाडाच्या गुणधर्माची संपूर्ण वातावरणाच्या शुद्धीकरणात महत्त्वाचे योगदान देते हे प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे. कचरा जाळल्याने त्यासोबत जळणारे प्लॅस्टिक, रासायनिक पदार्थांपासून बनलेल्या गोष्टी, टायर्स, रबर व इतर अनेक गोष्टी वातावरणात भयंकर विषारी वायूंचे प्रसारण करते.

होळीसारख्या परंपरा पूर्णपणे वैज्ञानिकच आहेत. त्यात लाकडे, गोवऱया, एरंडीची फांदी, पुरणपोळी, तूप यांची आहुती दिली जाते. या सर्व आहुत्यांचे रासायनिक विश्लेषण केले तर त्यामुळेच हवेत मोठय़ा प्रमाणात शुद्धता होण्यास मदतच होते. जर्मनीत अग्निहोत्राचे शास्त्रीय महत्त्व कळल्यामुळे अनेक ठिकाणी नियमित अग्निहोत्र केले जाते. यज्ञ विधी आमच्या येथे परंपरेने सुरू होते, परंतु साधुसंत, बाबा यांनी सांगितलेल्या गोष्टी केवळ ढोंग आहे, असे म्हणून व त्यांची खिल्ली उडवून आम्ही त्या बंद पाडल्या. तसे करणाऱयांना सनातनी म्हणून हिणवले गेले, परंतु यातील शास्त्रीय कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही.

आजकाल परंपरेने चालणाऱया होळीत आम्ही एक दिवस लाकडे जाळू म्हटलं तर लगेच जंगलाचा नाश होईल, अशी बोंब होते. पूर्वी आमच्याकडे घरोघरी चुलीवर अन्न शिजवायला लाकडेच वापरली जायची. आज आम्ही आधुनिक युगात डोळय़ांनी न दिसणारा धूर म्हणजे आमच्याकडे प्रदूषण कमी असा विचार करतो आहोत, परंतु आज पेट्रोलजन्य पदार्थ, एल.पी.जी., सी.एन.जी.सारखी इंधने आम्ही मोठय़ा प्रमाणात उपयोगात आणतो आहोत. ही सर्व कृत्रिम इंधने आहेत. या इंधनांमध्ये ऑक्सिजन नसतोच व त्यामुळे ती अधिक प्रदूषण करतात. उलट निसर्गतः जे इंधन उपलब्ध आहे त्यात हायड्रोजनसोबत ऑक्सिजनचे प्रमाण असते. त्यामुळे वातावरण प्रदूषित होण्याऐवजी पर्यावरण चांगले होण्यास फायदाच होतो.

जंगलाची कटाई फक्त होळीच्याच वेळेस होते असा आमचा गोड गैरसमज आहे. वर्षभर आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी जंगलाची कटाई हेत आहे ती मोठय़ा प्रमाणात आहे. होळीसाठी केवळ २ वर्ग किमी जंगलाची तोड होते, परंतु मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जगात दरवर्षी ९० हजार वर्ग किमी जंगलाचा नाश होतो हे लक्षात घेतले पाहिजे. होळीच्या निमित्ताने कटाई झालेल्या जंगलाचा लाभ पुढे येणाऱया चांगल्या पावसाच्या रूपात आम्हाला मिळतो, जो महत्त्वाचा आहे याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.

शेवटी असे आवाहन करावेसे वाटते की, होळीच्या दिवशी पारंपरिक होळी उत्साहाने, आनंदाने जारी करावी आणि संकल्प करावा की मी माझ्या परिसरात, जन्मदिवशी एक झाड लावून पर्यावरणाचे रक्षण व संगोपन करीन. पृथ्वीतलावर फक्त आपलाच देश आहे की जो यज्ञरूपाने हवेचे प्रदूषण कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. इतर सर्व राष्ट्रे फक्त प्रदूषणच पसरवत आहेत. जर आपल्या भावी पिढीला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपली पारंपरिक होळीच सर्वांनी साजरी करावी. त्यासाठीच हा लेखन प्रपंच.