स्मार्ट ठाण्याचा वाहतूककोंडीने श्वास कोंडला; चाकरमान्यांना लेटमार्क

ठाणे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली आहे. खारेगाव टोलनाक्यावरून कॅडबरी जंक्शनपर्यंत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. धोडबंदरवरून ठाणे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी तब्बल तीन ते साडे तीन तास लागत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड झाले आहेत.

अवजड वाहतूक आणि मेट्रोच्या कामाचे अयोग्य नियोजन यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक गाड्या फ्लायओव्हरवर बंद पडल्या असून चुकीच्या दिशेने गाडी चालवत येणाऱ्या वाहनचालकांमुळे आणि अवजड वाहनांमुळे ही कोंडी आणखी वाढली आहे. माजीवाडा, धोडबंदर रोडसह नितीन कंपनी, तीन हात नाका पुलावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास वेळेत कार्यालयात पोहोचण्यासाठी घराबाहेर निघालेल्या आणि गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या ठाण्याचा श्वास वाहतूककोंडीमुळे कोंडला. आधीच शहरात ठिकठिकाणी ट्रॅफिक जामचे सत्र सुरू असतानाच घोडबंदर रोडवर भलामोठा ट्रक पलटी झाला आणि रात्री 2 ते दुपारी 12 असे वाहतुकीचे बारा वाजल्यामुळे प्रवाशांची दहा तास लटकंती झाली. त्यामुळे घोडबंदर रोडवर माजिवडापासून ब्रम्हांडपर्यंत अनेक किलोमीटरच्या रांगा लागल्या त्यामुळे चाकरमान्यांच्या मस्टरवर लेटमार्क लागला, या ठप्प झालेल्या वाहतुकीत स्कूलबसही अडकल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. या रस्त्यावर दररोज होणारे अपघात, संथ गतीने सुरू असलेले मेट्रोचे काम, ठिकठिकाणी खड्डे आणि अवजड वाहनांची घुसखोरी यामुळे प्रवाशांना रोजच या रस्त्यावरून तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सलग दुसऱ्या दिवशी घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रौजजवळ अपघात झाला. न्हावा शेवा येथून बावळ हरयाणा येथे 34 टन 800 किलो पॅराफॉर्मल्डिहाईड केमिकल बॅगा घेऊन निघालेल्या मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता ट्रकचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे घोडबंदर रोडवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका ठाणेकरांना बसला. रिक्षाचालक, दुचाकी आणि कारचालकांनी विरुद्ध दिशेने वाहतूक केल्यामुळे दोन्ही रस्ते जाम झाले होते. त्यामुळे कामावर निघालेले चाकरमानी, शाळेत निघालेले विद्यार्थी व अॅम्ब्युलन्समधील रुग्ण जागोजागी अडकून पडले.

पालिका आयुक्तांसह मंत्रीही अडकले

घोडबंदरवरील वाहतूककोंडीमुळे माजिवडा, मानपाडा, कासारवडवली, बाळकुम, मुंबई-नाशिक हायवे जाम झाला. या वाहतूककोंडीचा फटका पालिका आयुक्त सौरभ राव व उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही बसला. या वाहतूककोंडीमुळे त्यांचीही तासन्‌तास लटकंती झाली.

मेट्रोचे काम सुरू असल्याने घोडबंदर रोडवरील रस्ते निमुळते झाले आहेत. त्यातच खड्यांमुळे वाहतूक मंद गतीने सुरू असते. एखादा अपघात, दुर्घटना घडल्यानंतर किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी मार्ग नसल्याने अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडसारखे बचाव दल पोहोचणार कसे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.