‘पेग’पेक्षा मुंबईकरांचा ‘वेग’ वाढला

सामना ऑनलाईन, मुंबई

थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत यंदा पेगपेक्षा मुंबईकरांचा वेग वाढल्याचे उघड झाले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसांत तब्बल ७ हजार ६०० सुसाट वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. दारुडय़ा चालकांच्या संख्येतही गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०ने भर पडली आहे. मुंबईत थर्टी फर्स्टच्या संध्याकाळपासून मुंबई पोलीस आणि वातूक पोलिसांनी ठिकठिकाणी फिल्डिंग लावली होती. नाकाबंदी, गस्त याचबरोबर वेगमर्यादा तपासण्यासाठी बसविण्यात आलेल्या कॅमेऱयातूनही वॉच ठेवण्यात येत होता. वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत १२ हजारांहून अधिक जणांवर नियम मोडल्याप्रकरणी कारवाई केली. यापैकी सर्वाधिक संख्या ही वेगमर्यादा ओलांडणाऱया चालकांची आहे. दोन दिवसांत ७६०० सुसाट चालकांवर कारवाई ही विक्रमी संख्या असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.