ट्रॅफिक पोलिसांची दादागिरी; दंडाच्या रकमेचा हिशेबच नाही

8

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत वाहतूक पोलिसांची दादागिरी सुरू आहे. ‘नो पार्किंग’चा फलक नसलेल्या ठिकाणी उभी केलेली वाहनेही जबरदस्ती टो करून नेली जात आहेत. त्या वाहनचालकांकडून सक्तीने दंड वसूल केला जात आहे. आश्चर्य म्हणजे कोणत्या वाहनचालकांकडून किती दंड वसूल केला याचा काहीच हिशेब नसल्याचे दिसून आले आहे.

प्रभादेवीतील एका नागरिकाने यासंदर्भात वाहतूक सहपोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या नागरिकाने सिद्धिविनायक मंदिराच्या मागील कामना सोसायटीजवळील गल्लीत त्याची एमएच 01-बीई-8119 ही बाईक पार्क केली होती. तिथे नो पार्किंगचा फलक नव्हता आणि आपल्या बाईकमुळे वाहतुकीलाही कोणतीही अडचण नव्हती. तरीसुद्धा आपली बाईक टो करून दादर पोलीस ठाण्यात नेण्यात आली असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. या नागरिकाने तक्रारीत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. टो करण्यात येणाऱया वाहनांकडून विदर्भ इन्फोटेक आणि शासन असा वेगवेगळा दंड का आकारला जातो? विदर्भ इन्फोटेकला 236 रुपये इतका दंड मिळतो तर शासनाला किती मिळतो? सिद्धिविनायक मंदिराजवळ पार्किंग व्यवस्था कुठे आहे? त्या परिसरातून आतापर्यंत किती वाहनांना दंड आकारला गेला? असे ते प्रश्न असून टोइंग करणाऱया कर्मचाऱयांच्या उद्धट भाषेवरही तक्रारीत आक्षेप घेतला गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या