
नव्वदच्या दशकात गोविंदाच्या विनोदी चित्रपटांची चांगलीच सद्दी होती. आंटी नंबर वन, हिरो नंबर वन, साजन चले ससुराल, दुल्हेराजा अशा धमाल चित्रपटांनी गोविंदाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. त्यात एक नाव होतं कुली नंबर वन या चित्रपटाचं. आता चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हीड धवन यांनी या चित्रपटाचा रिमेकही तयार केला आहे.
या नव्या कोऱ्या कुली नंबर वनचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. 3 मिनिटं 15 सेकंद इतक्या लांबीच्या ट्रेलरमध्ये वरुण आणि साराची नवीन जोडी चांगलीच जमलेली पाहायला मिळतेय.
या चित्रपटात साराच्या वडिलांची भूमिका परेश रावल यांनी साकारली आहे. परेश रावल हे त्यांच्या मुलीसाठी (सारासाठी) अतिशय श्रीमंत मुलगा शोधत असतात. तेव्हा त्यांची भेट वरुण धवनशी होते. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींना हा ट्रेलर आवडला नसून त्या तुलनेने गोविंदाच सरस ठरत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
‘कुली नंबर 1’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीने केली आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर 2020 रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
‘कुली नंबर 1’ हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर 1 चा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
पाहा ट्रेलर-