आईच्या वात्सल्याने ओतप्रोत भरलेला ‘भिकारी’.. पाहा ट्रेलर

57

सामना ऑनलाईन । मुंबई

आई म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती. असं म्हणतात की, देवाला सगळीकडे स्वतः येणं शक्य नव्हतं म्हणून त्याने ‘आई’ निर्माण केली. कदाचित म्हणूनच ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही म्हण पडली असावी. याच म्हणीवर आधारित स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

‘भिकारी’ हा चित्रपट आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर आधारित आहे. या ट्रेलरमध्ये सम्राट जयकर या यशस्वी मुलाची आणि त्याच्या आईची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ”माणुसकी काय असते हे शिकवलं माझ्या आईने…” ”कधी-कधी आयुष्य अशा वळणावर उभं करतं, जिथे स्वत:ला शिकवावं लागतं… देव आहे की नाही माहीत नाही पण आई आहे…” यांसारखे हळवे संवाद आई आणि मुलाच्या नात्यातील प्रेमाला अधोरेखित करतात.

अभिनेता स्वप्नील जोशीने ‘सम्राट जयकर’ची भूमिका साकारली आहे. अजय गोगावलेच्या आवाजातील ‘मागू कसा मी’ आणि सुखविंद सिंह यांच्या आवाजातील ‘जय देवा जय देवा’ गाण्यांनी चित्रपटाला श्रवणीयता दिली आहे. गणेश आचार्य यांच्या दिग्दर्शनातून एका माणसाचा अविश्वसनीय प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा शशी यांची असून पटकथा, संवाद आणि गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य यांची निर्मिती असलेला हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

पाहा भिकारीचा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या