रोजगारांच्या संधीनुसार तरुणांना प्रशिक्षण द्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

कोरोनाच्या संकटात अनेक तरुणांचे रोजगार गेले. या तरुणांना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगाराच्या जशा संधी निर्माण होत आहेत त्यानुसार त्यांना काैशल्य विकासाचे प्रशिक्षण द्या. रोजगाराच्या मागणीनुसार तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी कृती आराखडा तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काैशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाला बुधवारी दिले.

वर्षा येथे परिषद सभागृहात बुधवारी काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण झाले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊन काळातही विभागामार्फत एक लाख आठ्ठेचाळीस हजार रोजगार उपलब्ध केले आहेत ही चांगली बाब आहे, परंतु लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीत जसे रोजगार निर्माण होतील त्याला अनुसरून प्रशिक्षित तयार करण्याचे काम विभागाने करावे. या साठी सविस्तर असा कृती आराखडा लवकर तयार करण्यात यावा. तसेच ऑन जॉब प्रशिक्षण योजना कार्यान्वित करावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिष पुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. यावेळी काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दिपेद्रसिंह कुशवाह यांनी आयुक्तालयामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱया योजनांचे सादरीकरण केले.

काैशल्य विद्यापीठ निर्माण करा!

तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी काैशल्य विद्यापीठ निर्माण करण्याचा विचार करावा. प्रत्येक जिह्याच्या भौगोलिक रचना स्थानिक परिस्थितीनुसार रोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत. समृद्धी महामार्गलगतच्या जिह्यांत नवीन रोजगार उपलब्ध होतील त्याप्रमाणे प्रशिक्षित तयार करण्याचे नियोजन करावे असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या