जम्मू-कश्मीरमध्ये चकमक; १ पोलीस शहीद, मेजरसह ३ जवान जखमी

15

सामना ऑनलाईन । त्राल

जम्मू-कश्मीरमधील त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेली चकमक अखेर रविवारी सकाळी संपली. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान मंसूर अहमद शहीद झाला. लष्कराचा एक मेजर आणि दोन सैनिक जखमी झाले. सुरक्षा पथकाने दोन दहशतवाद्यांना ठार केले.

शोध मोहीम सुरू असताना काही चेहरा झाकलेल्या लोकांनी दगडफेक करुन सुरक्षा पथकाच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पण दगडफेकीला न जुमानता सुरक्षा पथकाने शोध मोहीम सुरू ठेवल्याचे पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवादी नेमके कुठे आहे आणि त्यांचे संख्याबळ याविषषयी पुरेशी माहिती हाती नसल्यामुळे ज्या दिशेने गोळीबार होत होता त्याच दिशेने सुरक्षा पथक प्रत्युत्तर देत होते. बारा तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या चकमकीत लष्कराचा एक मेजर आणि दोन सैनिक जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सुरक्षा पथकाला दोन दहशतवादी एका घरात लपल्याचा अचूक अंदाज आला. अखेर स्फोटकांच्या मदतीने घर उडवून देऊन लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले.

आपली प्रतिक्रिया द्या