त्र्यंबकेश्वरचे पेड दर्शन प्रकरण धर्मदाय आयुक्तांकडे

37

सामना ऑनलाईन । नाशिक

त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन व्यवस्थेकडे मुंबई धर्मादाय आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात २०० रुपयांत थेट दर्शनाची व्यवस्था विश्वस्तांनी केली आहे. या विरोधात मंदिराच्याच विश्वस्त ललिता शिंदे यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात तक्रार केली.

भाविकांना २०० रुपये शुल्क आकारून थेट दर्शन देणे रांगेतील भाविकांवर अन्यायकारक आहे, असे तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे. पेड दर्शन देवाच्या दारी गरीब-श्रीमंत भेदभाव करणारे आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत प्राचीन स्मारक म्हणून घोषित झालेले स्थळ आहे. येथे १९८५च्या पुरातत्त्व खात्याच्या कायद्याप्रमाणे दर्शनासाठी शुल्क आकारणे गैरवाजवी आहे, त्यामुळे असे दर्शन देता कामा नये; अशी भूमिका ललिता शिंदे यांनी मांडली

पेड दर्शनाविरुद्ध वेळोवेळी मागणी केलेली असताना पेड दर्शन कायम राहिल्याने विश्वस्त शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर न्यायालयाने मुंबई धर्मादाय आयुक्तांना चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. आता त्र्यंबकेश्वर येथील २०० रुपयांबाबत विश्वस्त काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या