कोल्हापूर महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची बदली

राज्यात पुन्हा एकदा आयएएस दर्जाच्या अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्याच आठवडय़ात कादंबरी बलकवडे यांचे पती व कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले शैलेश बलकवडे यांची पुणे येथे बदली झाली आहे.

सन 2021 मध्ये जिल्ह्यात आलेल्या महापुरात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कलशेट्टी यांनी प्रभावी काम केले होते. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांच्या नियुक्तीनंतर काही दिवसांतच महापालिका आयुक्त कलशेट्टी यांच्या जागी आयुक्त म्हणून कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झाली होती. याच काळात महापालिका सभागृहाची मुदत संपल्याने कादंबरी बलकवडे यांच्याकडे महापालिकेच्या प्रशासकपदाची जबाबदारी आली. दोन वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रशासक म्हणूनच कामकाज पाहिले.