एसटी कर्मचाऱयांच्या विनंती बदल्या यापुढे ऑनलाईन होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवाज्येष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱयांना समान न्यायाची हमी या नव्या पद्धतीने शक्य होणार आहे. एसटी महामंडळामध्ये विविध पदांवर सुमारे 87 हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे. कर्मचारी गंभीर आजारपण, पती-पत्नी एकत्रीकरण, आपापसातील बदली अशा अनेक कारणास्तव विनंती बदलीचे अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांकडे सादर करतात. परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे, बदल्यांमध्ये अनियमितता होत असते. अनेक कर्मचाऱयांचे विनंती बदली अर्ज वर्षानुवर्षे धूळ खात पडतात. या पार्श्वभूमीवर संगणकीय प्रणालीद्वारे अॅप एसटी महामंडळाकडून विकसित करण्यात आले आहे.